ऋचा पुजारीची आघाडी कायम--
By Admin | Updated: May 21, 2015 00:01 IST2015-05-20T23:28:07+5:302015-05-21T00:01:02+5:30
महिला बुद्धिबळ स्पर्धा

ऋचा पुजारीची आघाडी कायम--
सांगली : नूतन बुद्धिबळ मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या मीनाताई शिरगावकर स्मृती फिडे मानांकन खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत बुधवारी कोल्हापूरची फिडेमास्टर ऋचा पुजारी व मुंबईची जान्हवी सोनजी यांच्यात रंगलेल्या डावातील १८ व्या चालीला जान्हवी हिला शरणागती पत्करावी लागली. सायंकाळी पाचव्या फेरीअखेर ऋचा पुजारी ५ गुणांसह प्रथम स्थानावर, तर गुजरातची कविशा शहा ही ४.५ गुण मिळवित द्वितीय स्थानावर होती. ऋतुजा बक्षी व फिडेमास्टर साक्षी चितलांगे यांच्यातील डावाची सुरुवात उंटाच्या प्याद्याने झाली. डावाच्या मध्यात ऋतुजाने राणी व उंटाच्या चालीने दिलेला शह साक्षीने प्रत्युत्तर देऊन परतवून लावला. दोघींनीही ३२ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह आघाडी कायम राखली. ऐश्वर्या थोरात व कविशा शहा यांच्या डावाचा प्रारंभ राजाच्या प्याद्याने झाला. ऐश्वर्याला प्याद्याची आघाडी कायम राखण्यात अपयश आल्याने ७२ व्या चालीला कविशाने ऐश्वर्याला डाव सोडावयास भाग पाडले. स्वाती मोहता व वैभवी जाधव यांच्यातील डावाच्या मध्यात स्वातीने हत्तीच्या सहाय्याने दिलेला शह परतवून लावण्यात वैभवी अपयशी ठरली. त्यामुळे ४० व्या चालीला स्वातीने वैभवीला डाव सोडावयास भाग पाडले. वृषाली देवधर व पौर्णिमा उपळावीकर यांच्यातील सामन्यात वृषालीने २३ व्या चालीला पौर्णिमाचा पराभव केला. रिया लोहोटी व समीक्षा पाटील यांच्यातील सामन्यात दोघींनीही २४ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह आघाडी घेतली. हेत्वी पेटेडने श्रृती गुरवला ५३ व्या चालीला, श्रेया राठीने तन्वी आघवाडेचा ३४ व्या चालीला बरोबरीत रोखले. पाचव्या फेरीअखेर जान्हवी सोनेजी, खुशी सुराणा, स्वाती मोहता, साक्षी चितलांगे, संस्कृती महाजन, ऋत्वी शहा, ऋतुजा बक्षी, वृषाली देवधर या चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.