गरिबांसाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:23+5:302021-08-17T04:31:23+5:30

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राजक्ता कोरे, दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. अभिजित चौधरी, ...

The rich should release rations for the poor | गरिबांसाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे

गरिबांसाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राजक्ता कोरे, दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. अभिजित चौधरी, दीक्षित गेडाम, नितीन कापडणीस, चंद्रकांत गुडेवार आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गरिबांना अधिकाधिक लाभासाठी सधन कुटुंबांनी रेशनचे धान्य सोडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पद्मश्री डॉॅ. विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आयुक्त नितीन कापडणीस, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अधिक भयावह होती. तिसरी लाट आणखी गंभीर असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऑक्सिजन उपलब्धतेच्या क्षमतेपेक्षा रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. जिल्ह्यात ऑक्सिजन साठवण क्षमता वाढविली आहे. आरोग्य यंत्रणाही सक्षम केली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास खासगी रुग्णालयेही अधिग्रहित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ते म्हणाले, यंदा पावसाळ्यात कर्नाटकसोबतच्या समन्वयामुळे महाप्रलय टाळता आला. जीवितहानी टळली हे प्रशासनाचे मोठे यश आहे. महापालिकेचे नियोजनही चांगले झाले. नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आले आहेत. प्रत्येक पूरबाधिताला अन्न-धान्य मिळण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीतून सावरण्यासाठी तसेच महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी शासनाकडे निधी मागितला आहे. कोरोनामुळे आर्थिक स्थिती चांगली नसली तरी पूरबाधितांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपत्तीग्रस्तांसाठी एनडीआरएफच्या निकषांपुढे जाऊन मदतीचे धोरण अवलंबिले आहे. समाजातील दानशूर, सेवाभावी लोकांनी पूरग्रस्तांना मदत द्यावी.

ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या १४१ शाळांमधून ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नियोजन समितीमधून १६६ नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत. १३० शाळांमध्ये ९१७ वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जाईल. जतसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध झाल्याने तेथील दुष्काळमुक्तीचा आनंद आहे.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री पदकप्राप्त पोलीस उपाधीक्षक अजित टिके, विशेष सेवा पदकप्राप्त उपनिरीक्षक उमेश चिकणे, किरण मगदूम, युवराज घोडके व महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालेले हवालदार मनोज निळकंठ, नाईक अविनाश लाड, तेजस्विनी पाटील, शिपाई सुधा मोरे यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. महाआवास अभियानमध्ये उत्कृष्ट कामाबद्दल भूड, जाखापूर ग्रामपंचायतींचा सत्कार झाला. महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल बामणोलीच्या विवेकानंद रुग्णालयाला पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषदेत अध्यक्षा प्राजक्ता कोरे व महापालिकेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

चौकट

पाटगावमध्ये कोविड कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

पाटगाव (ता. मिरज) येथील प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा झाला. मिरज कोविड रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी अजितकुमार कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. रुग्णसेवेदरम्यान ते स्वत: कोरोनाबाधित झाले होते. सध्या कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवा बजावत आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने व रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांच्या हस्ते कांबळे यांचा सत्कार झाला.

Web Title: The rich should release rations for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.