क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंचे आत्मकथन प्रेरणादायी
By Admin | Updated: July 27, 2015 00:30 IST2015-07-26T23:22:02+5:302015-07-27T00:30:14+5:30
परिसंवादातील सूर : नव्या पिढीसमोर इतिहास आणावा; कार्यकर्त्यांना आवाहन

क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंचे आत्मकथन प्रेरणादायी
सांगली : क्र्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्यलढ्यासोबतच जातीव्यवस्थेविरोधातही लढा दिला. त्यांचे आत्मकथन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणला पाहिजे. ते आव्हान नव्या कार्यकर्त्यांनी पेलावे, असा सूर रविवारी सांगलीत आयोजित ‘एक संघर्षयात्रा’ या परिसंवादात उमटला. जी. डी. बापू लाड यांचे आत्मकथन असलेल्या ‘एक संघर्षयात्रा’ या पुस्तकावर येथील गरवारे कन्या महाविद्यालयात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी लोकसाहित्याच्या अभ्यासिका प्रा. तारा भवाळकर होत्या.
प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. बाबूराव गुरव, बापूसाहेब पुजारी यांनी परिसंवादात भाग घेतला. सुरुवातीला क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनी स्वागत व प्रास्ताविकात जी. डी. बापूंनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि त्यानंतरही देशातील जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, शेतीमालाला दर यासाठी लढा दिला, त्यांच्या संघर्षयात्रेतून आपल्या हक्कासाठी दुसऱ्या लढाईची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
प्रा. महाजन म्हणाले की, जी. डी. बापूंनी नि:स्वार्थीपणे स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यानंतरही ते सातत्याने समाजव्यवस्था, जातीव्यवस्थेविरोधात लढत राहिले. त्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज आहे. त्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की, या आत्मकथनात वर्ग, जातीविरोधात लढ्याचे प्रात्यक्षिकासह तत्त्वज्ञान मांडले आहे. परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी या पुस्तकातून मार्गदर्शन घेऊन लढण्याची पद्धत बदलली पाहिजे. आजही जातीव्यवस्थेचे समर्थन करणारी मंडळी देशात आहेत. त्यांना पुरस्कारही दिले जात आहेत. जात, धर्म, सावकारी, स्त्री-पुरुष विषमता याविरोधात लढा देण्यासाठी हा इतिहास प्रेरणादायी आहे.
प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, जी. डी. बापूंनी घरातील तांब्याची भांडी विकून चळवळ वाढविली. परिवर्तन चळवळ जिवंत राहिली पाहिजे, यासाठी मृत्यूचे कफन डोक्याला बांधून लढणाऱ्या व्यक्तीचे हे आत्मकथन आहे.
बापूसाहेब पुजारी म्हणाले की, स्वातंत्र्यचळवळीला आधार दिलेल्या कित्येक लोकांची इतिहासात नोंद नाही, याची खंत बापूंना होती. त्यांच्या वैचारिकवादाचा अभ्यास झाला पाहिजे. आताचे राजकीय पक्ष सत्तेसाठी निर्माण झाले आहेत.
यावेळी प्रा. तारा भवाळकर यांचेही भाषण झाले. व्ही. वाय. पाटील यांनी आभार मानले. यावेळी अरुण लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)