संशयित रुग्ण लपविल्यास खासगी डॉक्टरचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST2021-05-25T04:30:11+5:302021-05-25T04:30:11+5:30
सांगली : ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांनी संशयित रुग्णांना तात्काळ कोरोना चाचणीसाठी पाठवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र ...

संशयित रुग्ण लपविल्यास खासगी डॉक्टरचा परवाना रद्द
सांगली : ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांनी संशयित रुग्णांना तात्काळ कोरोना चाचणीसाठी पाठवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. रुग्णावर परस्पर उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला.
डुडी म्हणाले, ‘सुमारे ६१ टक्के मृत्यू रुग्ण दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत होत आहेत. कोरोना मृत्यूंच्या ऑडिटनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. याचा अर्थ रुग्ण आजार अंगावर काढत आहेत. शासकीय यंत्रणेकडून तपासणी न करताच घरात उपचार घेत आहेत. हे उपचार खासगी डॉक्टरच करत असावेत. रुग्णाला कोरोना तपासणी करण्याची सूचना दिली जात नाही. डॉक्टरकडे तपासणीची यंत्रणा नसेल तर त्यांनी सक्षम यंत्रणेला कळवायला हवे; पण ते कळवत नसल्यास गंभीर बाब ठरते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक संकेतस्थळ डॉक्टरांसाठी उपलब्ध केले आहे. त्यावर संशयित रुग्णाची माहिती भरायची आहे. त्या आधारे आमचे वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णापर्यंत पोहोचून तपासणी करतील.’
ते म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. चाचण्यादेखील वाढल्या आहेत. रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांपर्यंत आरोग्य कर्मचारी पोहोचत आहेत. वेळीच निदानामुळे रुग्णाचा मृत्यूदर कमी करण्यात यश मिळत आहे. अशा वेळी खासगी डॉक्टरांनी आजार किंवा रुग्ण लपवून परस्पर उपचार करणे योग्य नाही. त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.’