आढावा बैठकीच्या नियोजनाचा बोऱ्या
By Admin | Updated: December 30, 2014 23:28 IST2014-12-30T22:41:12+5:302014-12-30T23:28:02+5:30
अधिकारी ताटकळत : जिल्हाधिकारी कार्यालयातील ऊस दराच्या चर्चेमुळे बैठकच रद्द

आढावा बैठकीच्या नियोजनाचा बोऱ्या
सांगली : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच सांगलीत आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात आज (मंगळवारी) गोंधळ दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीच्या नियोजनाचे तीन-तेरा झाले. बैठकीच्या निमित्ताने आलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास ताटकळत उभे रहावे लागले. पालकमंत्र्यांसह आमदार-खासदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करून बैठकीची औपचारिकता पार पाडली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. तेथील स्क्रीनवर नियोजन समितीच्या बैठकीसाठी स्वागताचा मजकूरही झळकत होता. शासकीय अधिकाऱ्यांना एक दिवस अगोदरच याबाबतचे निरोप धाडण्यात आले होते. दुपारी एक वाजता बैठकीची वेळ असल्याने साडेबारालाच अधिकाऱ्यांनी सभागृहात गर्दी केली.
अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातील काही लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनीही गर्दी केली होती. बरोबर दुपारी एक वाजता पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र ते आढावा बैठकीऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले. त्यांच्याबरोबर खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनीही जिल्हाधिकारी कक्षात प्रवेश केला. तेथे ऊस दरासह अन्य प्रश्नांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. तब्बल तीन तास उलटले तरी बैठकीसाठी पालकमंत्री येत नसल्याने, ते हैराण झाले. तरीही शिष्टाचारानुसार त्यांनी प्रतीक्षा केली. अन्य सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही पालकमंत्री पाटील यांना निवेदन देण्यासाठी ताटकळत उभे होते.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकारी कक्षाचा दरवाजा उघडला आणि पालकमंत्री बाहेर पडले. आता आढावा बैठक होईल, असे वाटत असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या लाल दिव्याच्या वाहनात बसून निघून गेले. हा प्रकार पाहून उपस्थित अधिकारी अवाक् झाले. बैठक घ्यायची नव्हती, तर सर्वांना बोलावले कशासाठी, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. (प्रतिनिधी)