वाळू लिलावातून आठ कोटींचा महसूल
By Admin | Updated: February 9, 2015 23:55 IST2015-02-09T23:54:04+5:302015-02-09T23:55:42+5:30
आॅनलाईन पध्दत : उर्वरित ४६ प्लॉटचे लवकरच फेरलिलाव

वाळू लिलावातून आठ कोटींचा महसूल
सांगली : जिल्हा प्रशासनास आज, सोमवारी चार वाळू प्लॉटच्या निविदेसाठी घेतलेल्या आॅनलाईन लिलाव पध्दतीतून ८ कोटी ६० लाख ७१ हजार ५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. जिल्हा खणीकर्म विभागात लिलाव प्रक्रिया पार पडली. उर्वरित ४६ प्लॉटसाठी फेरलिलाव प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ५० प्लॉटसाठी ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधित निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यंदा निविदा प्रक्रियेस वाळू ठेकेदारांनी थंडा प्रतिसाद दिला होता. आज, सोमवारी पलूस तालुक्यातील अंकलखोप व दह्यारी तसेच शिराळा तालुक्यातील पुनवत आणि शिराळा खुर्द या चार ठिकाणच्या वाळू प्लॉटसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. नियोजित कालावधित दह्यारी आणि अंकलखोप येथील वाळू प्लॉटसाठी प्रत्येकी तीन निविदा आल्या होत्या, तर पुनवत येथील प्लॉटसाठी सहा आणि शिराळा खुर्द येथील प्लॉटसाठी आठ निविदा आल्या होत्या. चार प्लॉटसाठी तीन किंवा तीनपेक्षा अधिक निविदा आल्याने आॅनलाईन पध्दतीने आज दुपारी लिलाव प्रक्रिया पार पडली.
अंकलखोप येथील वाळू प्लॉटसाठीची प्रशासनाने जाहीर केलेली मूळ किंमत २ कोटी ८३ लाख ६१ हजार ८२६ रुपये इतकी होती; मात्र प्रत्यक्ष लिलावात त्याला २ कोटी ८६ लाख ४६ हजार ४५४ रुपये किंमत आली. दह्यारी येथील प्लॉटची मूळ किंमत २ कोटी ७६ लाख ६८ हजार ८८ रुपये इतकी असताना लिलावातून ३ कोटी ६२ लाख ५० हजार ३२० रुपये किंमत आली. पुनवत येथील प्लॉटसाठी मूळ किंमत ४२ लाख २९ हजार ७६६ रुपये इतकी होती. लिलावातून त्यास १ कोटी ७ लाख ६९ हजार ५८ रुपये किंमत आली. त्याचप्रमाणे शिराळा खुर्द येथील प्लॉटसाठी मूळ किंमत ४० लाख ३८ हजार ७१४ रुपये होती; मात्र लिलावातून त्यास १ कोटी ४ लाख ०५ हजार १७३ रुपये किंमत आली. म्हणजेच चारही वाळू प्लॉटची एकूण मूळ किंमत ६ कोटी ४२ लाख ९८ हजार ३८४ असताना प्रशासनास लिलावातून ८ कोटी ६० लाख ७१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला. (प्रतिनिधी)