सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी सहा वर्षांत कर्जाचे व्याजदर कमी केले. दर वर्षी लाभांश वाढवून दिला. गतवर्षी रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे लाभांश वाटप करता आलेले नाही. ही बाब विरोध संचालकांना माहीत असतानाही केवळ अज्ञानापोटी नैराश्येतून सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका अध्यक्ष उत्तमराव जाधव यांनी केला.
जाधव म्हणाले की, नफ्यातून लाभांश देण्यासाठी बँकेने वेगळी तरतूद केली होती. पण रिझर्व्ह बँकेने लाभांशाची रक्कम संस्थेच्या भांडवलात जमा करावी. असे निर्देश दिले. त्याविरोधात बँक असोसिएशन व बँक फेडरेशनच्या माध्यमातून आरबीआयकडे पाठपुरावा केला. पण त्यांनी मान्यता दिली नाही. विरोधक मात्र इतर बँकांनी लाभांश वाटप केल्याचे सांगत सभासदांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी एखाद्या बँकेने लाभांश दिल्याचे सिद्ध केल्यास आम्ही राजीनामा देऊ, अन्यथा त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवावे.
मासिक कायम ठेवी परत देण्याचा शिक्षक समितीने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ठेवीवरील व्याज आर्थिक वर्ष संपल्यानंतर जमा केले जाते. याची माहितीही विरोधकांना नाही. बँकेची वार्षिक सभा होण्यापूर्वीच पोटनियम दुरुस्ती नामंजूर करण्याची मागणी सहकार आयुक्तांकडे केली. यावरून त्यांचे अज्ञान उघड होते, असा टोलाही जाधव यांनी लगाविला.