गुंडांच्या दहशतीमुळे माघार : जयंत पाटील

By Admin | Updated: November 9, 2016 00:45 IST2016-11-09T00:45:20+5:302016-11-09T00:45:20+5:30

या जागेची निवडणूक स्थगित करावी

Retreat due to bullying threat: Jayant Patil | गुंडांच्या दहशतीमुळे माघार : जयंत पाटील

गुंडांच्या दहशतीमुळे माघार : जयंत पाटील

 
सांगली : गुंडांच्या दहशतीमुळे इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराने माघार घेतली आहे. याबाबत पोलिसप्रमुखांना कल्पना देऊनही त्यांनी काहीही केले नाही. दहशतीच्या जोरावर बिनविरोध झालेल्या या जागेची निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या आई सौ. सुशिला आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी दाखल झाल्यापासूनच विरोधी पक्षाच्या लोकांनी पाठविलेले गुंड शिवाजी पवार यांना धमकावत होते. त्यांच्यामागे परजिल्'ातील गुंडांकडून पाळत ठेवण्यात आली होती. प्रचंड दहशतीच्या जोरावर त्यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले आहे. पक्षीय कार्यालयात भेटून शिवाजी पवारांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. त्याचबरोबर जिल्हा पोलिस प्रमुखांनाही, या सुरू असलेल्या गुंडगिरीबद्दल कल्पना दिली होती. शिवाजी पवार यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची तसेच संबंधित गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. तक्रार दाखल केल्यानंतरच याबाबतची कार्यवाही करण्याची भूमिका पोलिस प्रमुखांनी स्पष्ट केली. गुंड अनोळखी असल्याने पवार यांनी तक्रार कोणाविरुद्ध द्यायची?, असा प्रश्न होता. पोलिसांनी वेळीच याप्रकरणी दखल घेतली असती, तर आमच्या उमेदवाराने माघार घेतली नसती. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे सर्वत्र निघत आहेत. इस्लामपुरात सर्रास मटका सुरू आहे. मटक्यातून आलेल्या पैशाद्वारे गुंडगिरी फोफावली आहे. त्याचा पहिला फटका नगरपालिका निवडणुकीत बसला आहे.
आयोगाकडे तक्रार करणार
इस्लामपुरातील प्रभाग क्र. १० मधील निवडणूक गुंडगिरीच्या जोरावर बिनविरोध केल्याने, राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत तक्रार करणार आहोत. निवडणुकीला स्थगिती देऊन, काही कालावधीने फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
 

Web Title: Retreat due to bullying threat: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.