रेठरेहरणाक्षकरांना पठ्ठे बापूरावांचा पडला विसर
By Admin | Updated: November 27, 2015 00:42 IST2015-11-26T22:56:52+5:302015-11-27T00:42:01+5:30
जन्मगावीच उपेक्षा : ११ नोव्हेंबररोजी जयंती कोणीही साजरी केली नाही

रेठरेहरणाक्षकरांना पठ्ठे बापूरावांचा पडला विसर
ताकारी : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) हे शीघ्रकवी पठ्ठे बापूराव यांचे जन्मगाव. त्यांच्याच जन्मगावी त्यांची जयंती साजरी न झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.श्रीधर कृष्ण कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरेहरणाक्ष येथे झाला. ११ नोव्हेंबर ही त्यांची जयंती. पण गावातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, सार्वजनिक मंडळे, वाचनालय तसेच त्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्या विकास मंडळाच्या पठ्ठे बापूराव विद्यालयातही त्यांची जयंती साजरी करण्याचे स्वारस्य कोणीही दाखवले नाही.प्रत्येकवर्षी पठ्ठे बापूराव यांची जयंती गावामध्ये साजरी केली जाते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज त्यांच्याच गावात पठ्ठे बापूराव उपेक्षित असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात अनेक थोर, महान पुरुष, साहित्यिक, समाजसुधारक यांची जयंती साजरी केली जाते. परंतु आपल्याच गावातील एका ज्येष्ठ साहित्यिकाची जयंती साजरी करण्याचे भान का राहिले नाही?, असा सवाल ग्रामस्थांकडून सध्या उपस्थित होत आहे.रेठरेहरणाक्ष जि. प. मतदार संघातील सदस्या सौ. सुनीता वाकळे या रेठरेहरणाक्ष गावच्याच आहेत. विशेष म्हणजे त्या पठ्ठे बापूराव यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्यालयात शिक्षिका आहेत. या विद्यालयातही त्यांची जयंती साजरी झाली नाही, हे विशेष. (वार्ताहर)
कोण, काय म्हणाले?
११ नोव्हेंबरला दिवाळी होती. सार्वजनिक सुट्टी असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत पठ्ठे बापूराव यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी अनवधानाने राहून गेले. यापुढे याची दक्षता घेऊन असे होणार नाही, याची खबरदारी घऊ.
- जे. डी. मोरे, सरपंच, रेठरेहरणाक्ष
देश व महाराष्ट्रातील थोर महापुरुष, साहित्यिक यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याला उजाळा देणे गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होऊन प्रोत्साहन मिळते. पठ्ठे बापूरावांनी तमाशाच्या माध्यमातून काव्यरचना करून समाज सुधारण्याचे काम केले.
- रंगरावबापू पाटील, ग्रामीण कथाकार, कामेरी