लाॅकडाऊन विरोधात किरकोळ विक्रेते उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:07+5:302021-07-14T04:31:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सततच्या लाॅकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या व्यापारी, दुकानदार, कामगार, फेरीवाले, भाजी, फळ, पथ विक्रेत्यांनी मंगळवारी रस्त्यावर ...

Retailers took to the streets in protest of the lockdown | लाॅकडाऊन विरोधात किरकोळ विक्रेते उतरले रस्त्यावर

लाॅकडाऊन विरोधात किरकोळ विक्रेते उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सततच्या लाॅकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या व्यापारी, दुकानदार, कामगार, फेरीवाले, भाजी, फळ, पथ विक्रेत्यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. हातात फलक घेऊन मानवी साखळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केले.

शहरातील कापडपेठ, गणपती पेठ, मारुती रस्ता, शास्त्री चौक तसेच सर्व व्यापारीपेठेतील किरकोळ विक्रेते व व्यापाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. कोरोना नियमांचे पालन करीत सर्वांनी दुकानासमोर हातात फलक घेत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, लॉकडाऊन काळातील कर्जाचे व्याज माफ करावे, कर्जास प्रोत्साहन अनुदान द्यावे, महापुराप्रमाणे सर्व घटकांना आर्थिक मदत मिळावी, महापालिका व पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम परत करावी आदी मागण्याही यावेळी केल्या.

पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक घेण्यास विरोध करायला हवा होता. त्यामुळेच वाळवा, कडेगाव तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाला. जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने पॉझिटिव्हिटी दराचा विपर्यास करीत अन्यायकारक लॉकडाऊन सुरू आहे. महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी दर साडेसहा टक्क्याच्या दरम्यान आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल करून व्यापारी पेठा खुल्या करण्याची आवश्यक होती. पण प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लादले जात आहे. व्यापारी, दुकानदार, हातगाडीवाले, फळे व भाजीवाले, चहाटपरी, हॉटेल व दुकान कामगार यांच्यावर आत्महत्या केल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का?

यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, ऊर्मिला बेलवलकर, रेखा पाटील, गोपाळ पवार, अभिमन्यू भोसले, विशाल पवार, उदय मुळे, रवि वादवणे, अमोल मुळीक, माजी नगरसेवक शिवराज बोळाज, सतीश साखळकर, रामचंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Retailers took to the streets in protest of the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.