सांगली : राज्यात झालेला ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा शिरकाव आणि खबरदारी म्हणून शासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांची वेळ कमी करुन निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, दर आठवड्याला जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर पाच स्तरातील नियमावली लागू करण्याबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार दर शुक्रवारी आठवड्याचा अहवाल तयार करुन पुढील आठवड्याचे निर्बंध ठरवले जात आहेत.
महापालिका क्षेत्रात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून महापालिका क्षेत्र व रुग्णांची संख्या जास्त असलेल्या वाळवा तालुक्यातील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
या आठवड्यात महापालिका क्षेत्रातील कोरोनाची नवीन रुग्णसंख्या सरासरी १७५ ते २००वर कायम आहे. राज्यात एकीकडे कोरोना चांगलाच उताराला लागला असताना, महापालिका क्षेत्रात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांशी चर्चा करुन दोन दिवसात शहरातील अनावश्यक गर्दी कमी न झाल्यास पुन्हा चौथ्या स्तरातील नियम लागू करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
चौकट
पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ
जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू केले, त्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट ६.८७ होता. मागील आठवड्यात वाढ होत तो आठ टक्क्यांवर गेला. या आठवड्यातही रविवारचा अपवाद वगळता इतर दिवशी रुग्णसंख्या वाढतच चालल्याने पुन्हा पॉझिटिव्हिटी रेट वाढण्याची शक्यता आहे.