मिरवणूक काळातील स्वागत कमानींवर निर्बंध
By Admin | Updated: August 17, 2014 23:10 IST2014-08-17T23:06:56+5:302014-08-17T23:10:11+5:30
मिरजेत सतर्कता : नेत्यांच्या जाहिराती आचारसंहितेच्या कात्रीत

मिरवणूक काळातील स्वागत कमानींवर निर्बंध
मिरज : गणेशोत्सवादरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने मिरजेत पोलिसांनी स्वागत कमानींवर निर्बंध लागू केले आहेत. कोणत्याही राजकीय नेत्यांची छबी कमानीवर झळकविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. मिरजेच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या स्वागत कमानीवरही इच्छुक उमेदवार दिसण्याची शक्यता होती. यासाठी उमेदवारांना कॅश करण्यासाठी कमानीचे संयोजक सरसावले आहेत. मात्र गणेशोत्सवादरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असल्याने उमेदवार धास्तावले आहेत. पोलिसांनी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून कमानीवर नेत्यांच्या जाहिरातींना लगाम लावण्याची तयारी केली आहे. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सात ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येतात. यावर्षी कमानीवर पक्ष किंवा नेत्यांची जाहिरात करावयाची असल्यास पोलीस व महापालिकेसोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कमान करणारे चित्रकार व फ्लेक्सचे मुद्रण करणाऱ्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. कमानीवरील जाहिराती व छायाचित्रे पोलिसांना अगोदर दाखवावी लागणार आहेत. विनापरवाना जाहिराती करणाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचे खटले दाखल करू, असे पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
स्वागत कक्षावरही येणार संक्रांत
राजकीय पक्षांच्या स्वागत कक्षावरही संक्रांत येणार आहे. शिवसेना, जनसुराज्य शक्ती, मनसे, रिपाइं या राजकीय पक्षांतर्फे मिरवणूक मार्गावर स्वागत कक्ष उभाण्यात येतात. त्यांच्या स्वागत कक्षासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यावर्षी कोणत्याही नवीन स्वागत कक्षाला परवानगी देण्यात येणार नाही, मात्र पोलीस दलातर्फे स्वागत कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.
४आचारसंहितेचे निर्बंध लागू झाल्यास राजकीय नेत्यांच्या जाहिरातीना मुकावे लागणार आहे. त्यातून तोडगा म्हणून इच्छुकांच्या संस्थेच्या जाहिराती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.