सांगली : कोरोनाच्या डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याने याठिकाणी आता अधिक निर्बंध येऊ पाहत आहेत. त्यामुळे हॉटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सांगली जिल्हा हा चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि बार पुन्हा बंद राहणार आहेत. त्यामुळे हाॅटेलिंगचा काही दिवस आनंद घेणाऱ्या नागरिकांना आता पुन्हा हॉटेलपासून दूर राहावे लागणार आहे.
चौकट
केवळ घरपोच सेवाच सुरु राहणार
हॉटेल, रेस्टॉरंटसाठी पार्सल सेवा व घरपोच सेवा सुरू राहतील. बारसाठी फक्त घरपोच सेवा सुरू राहील.
हॉटेल्समधील रेस्टॉरंट व बार हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेलमध्ये प्रवेशाला परवानगी नसेल.
बाहेरील ग्राहकांसाठी वरीलप्रमाणे प्रतिबंध लागू असेल.
कोट
हॉटेल इंडस्ट्री सध्या प्रचंड अडचणीत आहे. हॉटेल व्यावसायिकांचा व त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचा कोणीही विचार करत नाही. हॉटेल व्यावसायिकांनाच त्यांची अडचण दूर करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने या व्यावसायिकांसाठी काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा.
- प्रवीण शेट्टी, हॉटेल व्यावसायिक
कोट
हॉटेल व्यवसायाला लागू असलेले सर्व कर बंद काळातही आम्हाला भरावे लागतात. दुसरीकडे पूर्वीच्या तुलनेत घरपोच सेवेतून १० टक्केही व्यवसाय होत नाही. त्यामुळे हा तोटा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
- लहू भडेकर, हॉटेल व्यावसायिक
कोट
कोणत्याही अन्य व्यवसायात आम्ही जाऊ शकत नाही. हॉटेल व्यवसायावर आमचे कुटुंब अवलंबून आहे. हॉटेल्स बंद राहिली तर आमची कुटुंबे जगणार कशी. मालकांनी साथ दिली म्हणून अद्याप तग धरुन आहोत. - राजू पारसे, हॉटेल कर्मचारी
कोट
दीड वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात आम्ही सापडलो आहोत. त्यामुळे अनेक प्रश्न सतावत आहेत. भविष्यात आणखी काय होईल, याची चिंताही लागली आहे. - टोटन कौर, हॉटेल कर्मचारी
चौकट
जिल्ह्यातील हॉटेल्स
२८६६
त्यावर अवलंबून कर्मचारी ७५००