जतमध्ये पोषण आहार वाटपावर निर्बंध
By Admin | Updated: July 6, 2015 00:53 IST2015-07-06T00:35:59+5:302015-07-06T00:53:44+5:30
अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई : पुण्यातील प्रयोगशाळेत होणार कालबाह्य नमुन्यांची तपासणी

जतमध्ये पोषण आहार वाटपावर निर्बंध
संख : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जत तालुक्यात दरीबडची येथील अंगणवाड्यांना भेट देऊन, कालबाह्य पोषण आहाराची माहिती घेतली होती. ठेकेदारांनी पोषण आहार उचलल्यामुळे कालबाह्य पोषण आहार आढळला नव्हता. पोषण आहारातील शिक्का पुसलेल्या दोन पिशव्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. तपासणीचा अहवाल येईपर्यंत पोषण आहाराचे वाटप थांबविले आहे.
जत तालुक्यातील ३४५ अंगणवाड्यांना पसायदान महिला विकास संस्था सांगली या केंद्राकडून आहाराचा पुरवठा केला जातो. जत तालुक्यातील अंगणवाड्यांचे बालक, गरोदर महिला व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १ जुलैच्या अंकात प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत एकात्मिका बाल विकास योजना विभागाने कालबाह्य पोषण आहार परत घेण्याचे व नवीन पोषण आहार देण्याचे पत्र दिले. त्यानुसार तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांतील कालबाह्य पोषण आहार ठेकेदारांनी परत घेऊन नवीन पोषण आहाराच्या बॅगा दिल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल पवार, राहुल खंडागळे, श्रीमती रूपाली खापणे, तानाजी कांबळे यांच्या पथकाने दरीबडची येथील अंगणवाड्यांना भेट दिली होती. ठेकेदारांनी अगोदरच अंगणवाड्यांतील शिल्लक असलेला कालबाह्य पोषण आहार उचलला होता.
त्यामुळे तेथे काहीही आढळून आले नाही. या पथकाने जतमध्येही भेट दिली. जतमधील संशयित ठिकाणाहून साठा हलविण्यात आल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)
अंगणवाड्यांतील कालबाह्य पोषण आहार ठेकेदारास परत देऊन दुसरा देण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन पथकास दरीबडची येथे कालबाह्य पोषण आहार मिळाला नाही. परंतु बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोषण आहाराच्या दोन पिशव्या आम्ही दरीबडचीतून घेतल्या होत्या. त्यातील नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. अहवाल येईपर्यंत पोषण आहाराचे वाटप थांबविले आहे.
- ए. आर. मडके, सहायक गटविकास अधिकारी
चोर-पोलिसांचा खेळ
कालबाह्य पोषण आहाराच्या तक्रारी केल्यानंतर तो ठेकेदारांना परत करण्याचा शहाणपणा एकात्मिक बालविकास विभागास सुचला नाही. बातमी प्रसिध्द झाल्यानंतर लगेच ठेकेदारास तो परत करण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाचा ससेमीरा चुकविण्यासाठी तर केला नाही ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या खाबूगिरीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.