रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह रात्री आठनंतर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:19+5:302021-03-30T04:17:19+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दररोजची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत. २८ ...

रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह रात्री आठनंतर बंद
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दररोजची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत. २८ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत निर्बंध लागू राहतील. चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्री आठनंतर बंद राहतील.
जिल्हाभरात जमावबंदी लागू केली असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. आदेशाचा भंग केल्यास प्रती व्यक्ती एक हजार रुपये इतका दंड केला जाईल. बगीचे, मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. मास्क नसल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट सील केली जाणार आहेत. त्याशिवाय दंड आकारणी व कायदेशीर कारवाईदेखील होईल.
गृह अलगीकरण होणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित डॉक्टरांनी स्थानिक वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेला देणे सक्तीचे आहे. गृह अलगीकरणात राहिलेल्या रुग्णाच्या घरावर तसा फलक लावावा लागेल. रुग्णाच्या हातावर शिक्का मारावा लागेल. संबंधित रुग्ण घरातून बाहेर पडल्यास त्याचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येणार आहे.
सरकारी कार्यालयांत गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्त्वाची कामे असलेल्यांनाच प्रवेश मिळेल. एखाद्या बैठकीला येण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांकडून प्रवेशपत्र दिले जाईल. पत्राशिवाय प्रवेश नसेल.
सर्व धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखूनच भाविकांना प्रवेश देता येईल. दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणासारख्या सुविधाही द्यायच्या आहेत. मास्कचा वापर व शरीराचे तापमान मोजूनच धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करता येईल. सार्वजनिक वाहतुकीस सशर्त परवानगी आहे. अटींचा भंग केल्यास ५०० रुपये दंड केला जाईल.
चौकट
असे असतील निर्बंध
- रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
- चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद, होम डिलिव्हरीला परवानगी
- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध, सभागृह व नाट्यगृहातही कार्यक्रमांना बंदी
- लग्नासाठी ५० व अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई.