अधिकाऱ्यांना परत पाठविण्याचा ठराव
By Admin | Updated: December 22, 2016 23:35 IST2016-12-22T23:35:01+5:302016-12-22T23:35:01+5:30
जिल्हा परिषद : कृषी, महिला व बालकल्याण विभागाकडील वस्तू खरेदीतील गोलमालप्रकरणी संताप

अधिकाऱ्यांना परत पाठविण्याचा ठराव
सांगली : जिल्हा परिषदेकडील कृषी व महिला, बालकल्याण विभागाने केलेल्या वस्तू खरेदी प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने, यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्याचा ठराव गुरुवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आला. वस्तू खरेदीतील अनियमितपणामुळे जिल्हा परिषदेची व सदस्यांचीही बदनामी झाल्याची भावना व्यक्त करत, यातील सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सदस्य आक्रमक झाले होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सभेत जिल्हा परिषदेकडील चापकटर, शिलाई यंत्र, स्प्रे-पंप, लेडीज सायकल खरेदी प्रकरणातील अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्याच्या ठरावासह इतर विषयांवर जोरदार चर्चा झाली.
सभेत विषयपत्रिकेनुसार चर्चा झाल्यानंतर सदस्य रणधीर नाईक यांनी, स्वीय निधीतील विविध योजनांतून शिलाई यंत्र, लेडीज सायकल व स्प्रे-पंप खरेदी प्रक्रियेबाबत अनियमिततेची तक्रार केली होती, त्याचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला. विभागीय आयुक्त व राज्य शासनाच्या एका समितीने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असून, त्यात अनियमितता असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषदेची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत, त्यांना शासनाकडे परत पाठविण्याचा मुद्दा नाईक यांनी उपस्थित केला. त्यास सभागृहातील सर्वच सदस्यांनी पाठिंबा व्यक्त करीत, खरेदी प्रकरणातील तीन अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्याचा ठराव घेण्यात आला. चापकटर खरेदीतून जिल्हा परिषदेचे नुकसान झाले असून, नुकसानीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला असल्याचा मुद्दा नाईक यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषदेतील अनेक विभागात अनेक वर्षे एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांची तातडीने बदली करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आपण शासनाचा निषेध करू शकत नसलो, तरी ग्रामीण भागातील जनतेची भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची मागणी सुरेश मोहिते, प्रकाश देसाई आदींनी केली. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यासाठी टंचाई निधीतून निधीची तरतूद करण्याची मागणी देसाई यांनी केली.
यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, सभापती भाऊसाहेब पाटील, सुनंदा पाटील, कुसूम मोटे, दिलीप पाटील, अजयकुमार माने, रमेश जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वसुली करा : सदस्य ठाम
जिल्हा परिषदेकडील वस्तू खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सदस्य रणधीर नाईक यांनी केली. अधिकाऱ्यांवर केवळ कारवाई न करता, जिल्हा परिषदेच्या झालेल्या नुकसानीची वसुली करण्याची मागणीही सदस्यांनी केली. यात जादा अधिकारी गुंतल्याने या प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेवटची सभा आणि सदस्यांची हुरहूर
जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा शेवटचीच सभा असल्याची भावना अनेक सदस्यांनी बोलून दाखविली. शेवटची सभा असल्याने काही सदस्यांनी, जाता-जाता का होईना चर्चेत सहभागी व्हा, असा चिमटा काढला. मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी मात्र, ही शेवटची सभा नसून अजून एखादी सभा होईल, असे सांगितले. असे असले तरी, धोरणात्मक निर्णयासाठी ही शेवटचीच सभा असल्याने, अनेक सदस्यांनी भागातील प्रश्न पोटतिडकीने मांडले.