महापालिका कत्तलखान्याचा परवाना रद्दचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:21+5:302021-06-26T04:19:21+5:30

मिरज : मिरज - बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याला वड्डी ग्रामपंचायतीने दिलेला परवाना रद्द करण्याचा ठराव ...

Resolution to revoke the license of Municipal Slaughterhouse | महापालिका कत्तलखान्याचा परवाना रद्दचा ठराव

महापालिका कत्तलखान्याचा परवाना रद्दचा ठराव

मिरज : मिरज - बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याला वड्डी ग्रामपंचायतीने दिलेला परवाना रद्द करण्याचा ठराव मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. तसेच उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे बळी घेणाऱ्या डाॅ. जाधव यांच्या मालमत्तेची विक्री करून रुग्णांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आली.

मिरज पंचायत समितीची मासिक सभा प्रभारी सभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांच्या उपस्थितीत व्हिडीओ काॅन्फरन्सव्दारे पार पडली. कोरोना संकटात जनतेच्या आरोग्याविषयी संवेदनशून्य बनलेल्या महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांची सूचना डावलत कत्तलखाना सुरू ठेवल्याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस यांचा निषेध नोंदवत वड्डी ग्रामपंचायतीने दिलेला परवाना रद्द करावा, अशी मागणी प्रभारी सभापती अनिल आमटवणे यांनी केली व तसा ठराव करण्यात आला.

मिरजेतील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णालयात उपचाराच्या नावाखाली सुमारे ८७ रुग्णांचे बळी घेण्यात आले. याला कोरोना सेंटरचे संचालक डाॅ. महेश जाधव हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कृष्णदेव कांबळे यांनी केली. डाॅ. जाधव यांची मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करावी व मृत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत करण्याची मागणीही सभापती अनिल आमटवणे, कृष्णदेव कांबळे यांनी केली व तसा ठरावही घेण्यात आला.

तालुक्यात झालेल्या विकासकामांच्या मूल्यांकनाची कागदपत्रे संबंधितांना दिली जातात. मात्र, याचे रेकाॅर्ड बांधकाम विभागाकडे नसल्याने कामात गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही. मूल्यांकनाचे रेकाॅर्ड ठेवण्याची मागणी अशोक मोहिते यांनी केली. किरण बंडगर, राहुल सकळे, सतीश कोरे, सुवर्णा कोरे यांनीही प्रश्न उपस्थित केले.

चौकट

आमदार खाडे लक्ष घालणार का?

कत्तलखान्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनतेच्या आरोग्यासाठी बंद पाळून दक्षता घेतली जात असताना आरोग्याची फिकीर न करता सुरू असलेल्या कत्तलखान्याबाबत आमदार सुरेश खाडे गप्प का, या प्रश्नी ते लक्ष घालणार का, असा प्रश्न सभापती अनिल आमटवणे यांनी उपस्थित केला.

Web Title: Resolution to revoke the license of Municipal Slaughterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.