जिल्ह्यातील रुग्णांसाठी ९० टक्के बेड राखीव ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:43+5:302021-05-18T04:27:43+5:30
सांगली : परराज्यातील रुग्णांचा ओघ वाढल्याने जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात स्थानिक कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील रुग्णांसाठी ९० टक्के बेड राखीव ठेवा
सांगली : परराज्यातील रुग्णांचा ओघ वाढल्याने जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात स्थानिक कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. जिल्ह्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील ९० टक्के रुग्णांना शासकीय व खासगी रुग्णालयात प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
याबाबत सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात सर्व व्हेंटिलेटर बेड फुल्ल आहेत. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड व गरीब रुग्णांना योजनेतील ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. अशात रुग्णांचे नातेवाईक कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याही ठिकाणी त्यांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची प्रकृती चिंताजनक होत आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील शासकीय व काही खासगी कोविड रुग्णालयात कर्नाटकातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे स्थानिक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. योग्य उपचाराअभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. एकीकडे कर्नाटक सरकार महाराष्ट्रात ऑक्सिजन देण्याकरिता जाणीवपूर्वक अडवणूक करीत होते. तर दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णांना उपचार कमी पडत असताना कर्नाटकातील रुग्णांचे उपचार करून स्थानिक रुग्णांना मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचविण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी स्थानिक रुग्णांना जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात ९० प्रथम प्राधान्य देऊन योग्य उपचार द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.