शिष्यप्रेमाची श्रीमंती मिरविणारा कार्यकर्ता शिक्षक

By Admin | Updated: May 20, 2016 00:07 IST2016-05-19T22:56:48+5:302016-05-20T00:07:43+5:30

अनपेक्षितपणे त्यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस एका संमेलनासारखा साजरा करुन गौरविलं.

Researcher Worker Teacher | शिष्यप्रेमाची श्रीमंती मिरविणारा कार्यकर्ता शिक्षक

शिष्यप्रेमाची श्रीमंती मिरविणारा कार्यकर्ता शिक्षक

एखाद्या शिक्षकाचा पन्नासावा वाढदिवस त्याचे सर्व आजी-माजी विद्यार्थी एकत्र येऊन साजरा करतात. गुरुला सगळे मिळून चक्क चारचाकी गाडी भेट देतात. मानपत्र देऊन त्याचा हृद्य गौरव करतात... असं चित्र एखाद्या शिक्षकाच्या वाट्याला अलीकडच्या काळात क्वचितच येईल. पण भीमराव ईश्वरा धुळूबुळू नावाच्या, मिरजेत गेली २५ वर्षे अकौन्टन्सीचे क्लासेस घेणाऱ्या एका हाडाच्या शिक्षकाला निरपेक्षपणे केलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कामामुळे शिष्यप्रेमाची ही निर्व्याज श्रीमंती प्राप्त झाली आहे. शिक्षकाची भूमिका बजावताना हा कविमनाचा माणूस विद्यार्थ्यांचा हळवा पालकही होतो. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा निर्वेध मार्ग तयार करण्यासाठी आयुष्याचा दिवा करतो. अभ्यासक्रमाबाहेर जाऊन विद्यार्थी चांगली माणसं कशी होतील, यासाठी समाजाबरोबर चळवळत राहतो. याची जाण ठेवून दोन वर्षांपूर्वी या निर्मळ मनाच्या शिक्षकाला, अनपेक्षितपणे त्यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस एका संमेलनासारखा साजरा करुन गौरविलं.

थोडीशी जिराईत शेती वाट्याला आलेले भीमरावचे वडील ईश्वरा धुळूबुळू आणि भाजी विकून संसाराला हातभार लावणारी आई, अशा काबाडकष्ट करणाऱ्या जोडप्याचं भीमराव हे शेंडेफळ. ईश्वरा धुळूबुळू भेदिक गायचे. लोकसंगीत आणि लोककलांमध्ये ते पारंगत होते. दानपट्टा चालवायचे. छोटा भीमा त्यांच्याबरोबर भेदिक म्हणायला जायचा. त्याच्या कोवळ्या मनावर या लोकसंगीताचा चांगलाच प्रभाव पडला आणि वयाच्या १२ व्या वर्षी सहावीत असताना त्यानं या शाहिरांच्या संचासाठी उत्तम गाणं लिहिलं. बाबू भैरू शेरबंदे आणि शंकर मेंढे या त्यावेळच्या गाजलेल्या शाहिरांनी हे वेगळ गाणं एका विशेष कार्यक्रमात सिंदखेड राजा येथे सादर केलं आणि त्याला दादही चांगली मिळाली. पुढं महाविद्यालयात गेल्यावर कादंबरीकार व कथाकार प्रा. डॉ. मोहन पाटील सरांनी भीमरावच्या अंगी असलेले गुण हेरुन त्याला उत्तेजन दिलं. त्या काळात त्याच्या कविता अनुष्टुभ, लोकप्रभा आणि मराठीतल्या सकस साहित्यिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या. अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्याच्या कवितांना पारितोषिके मिळाली. त्याने लिहिलेल्या ‘बेअब्रू’, ‘मुक्ती’, ‘बळी’ अशा काही एकांकिकाही त्या काळात नाट्य चळवळीत भाव खाऊन गेल्या. ‘मोक्ष’ नावाची एकांकिका तर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत धडकून आली.
लोकसंगीतातून त्याच्या अंगी भिनलेल्या कवितांनी आणि नाटकानं त्यांना विद्यार्थीदशेतंच चार पैसे मिळवून द्यायला सुरुवात केली. कुणाला मंगलाक्षता लिहून दे, कुठं गणपती उत्सवाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी स्क्रीप्ट लिहून दे, आकाशवाणीवर ‘प्रभातीचे रंग’ किंवा ‘घरोघरी’सारखी मालिका लिही... असं करता करता त्यांच्यातल्या साहित्यिकानं अलीकडेच सिनेमासाठीही गाणी लिहिली. एका स्थानिक दैनिकाच्या पुरवणीच्या संपादनाचं कामही त्यांनी काही काळ केलं. कौस्तुक देशपांडे, भालचंद्र डोंगरे, विनोद सन्मुख या कलाकार मित्रांच्या साहाय्याने गीतशील्प नावाचा वाद्यवृंद उभारण्याची कल्पनाही त्यानं सशक्तपणे अंमलात आणली.
साहित्य क्षेत्रातील त्याची घोडदौड त्याच्या काव्यप्रतिभेमुळे थोरामोठ्यांची दाद मिळवत गेली. त्याने पु. ल. देशपांडे, विंदा, वसंत बापट, सुरेश भट, कृ . ब. निकुंब, पाडगावकर, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे, फ . मु. शिंदे, विठ्ठल वाघ अशा अनेकांच्या कौतुकाची थाप भीमरावला मिळाली. ‘कवडसे’ नावाचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित झाला. पण या सगळ्यापेक्षा साहित्य क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सांगली - कोल्हापूर - सातारा - बेळगाव जिल्ह्यातल्या गावा-गावात उभारणाऱ्या साहित्य चळवळीला मोलाचा हातभार ठरली आहे. २००८ मध्ये सांगलीत झालेल्या साहित्य संमेलनातही तो एक कार्यकर्ता म्हणून तळमळीनं राबला.
त्यांच्या या गुणांमुळंच सांगली, मिरजेतील अनेक सांस्कृतिक संस्थांतून ते क्रियाशील आहेत. शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठाचे तर ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ते संचालकही आहेत.
वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. पण त्यावर चैतन्य मानेंसारख्या संवेदनशील कविमित्राने स्वतंत्र अकौन्टन्सीचे क्लासेस सुरु करण्यासाठी भीमरावला मदत केली आणि गेली २५ वर्षे एक उत्तम आणि संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थीप्रियताही संपादन केली. मध्यंतरी खासगी क्लासेसविरोधी शासनाने एक अध्यादेश जारी केला. तेव्हा बाळासाहेब लिमये सर, संजय कुलकर्णी, रवींद्र फडके आदी समव्यावसायिकांना एकत्र करुन भीमराव धुळूबुळूंनी संघटना बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या संघटनेचे जिल्हाध्यक्षपदही तीन वर्षे भूषविले. राज्य संघटनेचे सहकार्यवाहपदही भूषविले.
एक संवेदनशील कवी, आदर्श शिक्षक, चोखंदळ संपादक, उत्कृष्ट वक्ता व सूत्रसंचालक असूनही, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या निर्मळ कार्यकर्त्याची भूमिका पार पाडताना भीमराव धुळुबूळू अधिक आनंदी असतात.
वडिलांच्या शाहिरी परंपरेला उजाळा देण्यासाठी गेली आठ वर्षे ते त्यांच्या स्मृतिदिनी शाहिरांच्या मेळाव्याचे आयोजन करतात. अनेक रक्तदान शिबिरे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमांचे उपक्रम आणि आपत्कालीन मदतकार्यात ते खारीचा वाटा उचलत असतात.
- महेश कराडकर

Web Title: Researcher Worker Teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.