‘वालचंद’च्या ताब्यावरून पुन्हा वाद
By Admin | Updated: May 25, 2016 23:39 IST2016-05-25T23:14:23+5:302016-05-25T23:39:06+5:30
गुंडगिरीचा आरोप : संचालकाला दमदाटी करून हटविले, एमटीईने आरोप फेटाळले

‘वालचंद’च्या ताब्यावरून पुन्हा वाद
सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून वालचंद अॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटी यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. मंगळवारी दुपारी एमटीईच्या गुंडांनी महाविद्यालयात प्रवेश करून संचालक डॉ. जी. व्ही. परीशवाड यांना दमदाटी करून हाकलून लावल्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचे व्यवस्थापन कौन्सिलचे रवी पुरोहित यांनी सांगितले. एमटीईचे सचिव प्रा. श्रीराम कानिटकर यांनी हे सर्व आरोप फेटाळत, व्यवस्थापन कौन्सिल स्टंटबाजी करीत असून, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा बुधवारी केला.
येथील प्रसिद्ध वालचंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून वालचंद अॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्यात वाद सुरू आहे. सध्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन समितीकडे (अॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल) आहे. मंगळवारी दुपारी एमटीईचे सचिव श्रीराम कानिटकर व शंभरहून अधिक जणांनी महाविद्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचार्य व संचालक जी. व्ही. परीशवाड यांना दमदाटी करून त्यांना बेकायदेशीररित्या पदावरून हटविल्याचा आरोप व्यवस्थापन समितीचे सदस्य रवी पुरोहित यांनी केला. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमटीईचे अध्यक्ष तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गुंडांनी मंगळवारी प्रा. कानिटकर यांच्यासह महाविद्यालयाच्या आवारात शिरकाव केला. त्यांनी प्राचार्य व संचालक परीशवाड यांच्या कार्यालयात घुसून त्यांना पदभार सोडण्यासाठी दमदाटी केली. त्यांना कार्यालयाबाहेर काढून त्यांच्याकडील चाव्या ताब्यात घेतल्या. परीशवाड यांच्याजागी एम. जी. देवमाने यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे पदभार सोपविला. महाविद्यालयाच्या आवारात शंभरहून अधिक गुंड फिरत असून ते दहशत माजवत आहेत. त्याचा परिणाम पाच हजार विद्यार्थ्यांवर होत असून, विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक दहशतीखाली आहेत.
याबाबत एमटीईचे सचिव प्रा. कानिटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पुरोहित यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, वालचंद महाविद्यालयाच्या तत्कालीन संचालक मंडळाने गेली चार वर्षे सोसायटीकडे वार्षिक ताळेबंद व आर्थिक अहवाल सादर केलेला नाही. महाविद्यालयाला स्वतंत्र अस्तित्व नसताना महाविद्यालयाच्या नावे वेगळे पॅनकार्ड काढून त्याचा गैरवापर केला. याप्रकरणी डॉ. परीशवाड यांना निलंबित करून चौकशी करण्याचा निर्णय सोसायटीच्या बैठकीत झाला. त्यानुसार डॉ. परीशवाड यांच्याजागी संचालक म्हणून एम. जी. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र देण्यासाठी परीशवाड यांच्याकडे देवमाने गेले होते. कोठेही दमदाटी, गुंडगिरीचा प्रकार घडलेला नाही. वालचंद व्यवस्थापन समितीकडून याबाबत स्टंटबाजी केली जात आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : पुरोहित
भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख व त्यांच्या समर्थकांनी वालचंद महाविद्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेतला आहे. डॉ. परीशवाड यांना दमदाटी केल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. लवकरच आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सदस्य रवी पुरोहित यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनीही व्यवस्थापन समितीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे पुरोहित म्हणाले.