पलूस : आमणापूर येथील कृष्णा नदीच्या पुलावरील सरंक्षक ग्रील कठडे महापुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. या कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाकडे करण्यात आली. पंधरा दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रिपांईचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी दिला.
तिरमारे म्हणाले की, महापुरात आमणापूर नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने संरक्षक ग्रील कठडे वाहून गेले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पुलावरून वाहतूक मोठी आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्यात येईल. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष शीतल मोरे, रमजान मुजावर, सलमान पठाण, विजय कांबळे, किरण सदामते उपस्थित होते.