भाडे द्या, नाहीतर दुकान, घर सोडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:55+5:302021-05-17T04:24:55+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग आणि त्यातून सुरू झालेल्या लॉकडाऊनचे साइड इफेक्टस् आता अनेक गोष्टींवर दिसू लागले आहेत. स्वत:च्या हक्काचा ...

भाडे द्या, नाहीतर दुकान, घर सोडा !
सांगली : कोरोनाचा संसर्ग आणि त्यातून सुरू झालेल्या लॉकडाऊनचे साइड इफेक्टस् आता अनेक गोष्टींवर दिसू लागले आहेत. स्वत:च्या हक्काचा निवारा नसलेले भाडेकरू व पोट भरण्यासाठी भाड्याच्या दुकानात व्यावसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मालकांशी भाड्यावरून संघर्ष होताना दिसत आहे. यातून काही घरमालकांनी भाडे द्या, अन्यथा घर, दुकान सोडा, असा इशारा दिल्याने भाडेकरू हादरले आहेत.
कठोर भूमिका घेणाऱ्या घरमालकांची संख्या अधिक दिसत असल्याने हा प्रश्न आता गंभीर होत आहे. सर्वप्रकारचे व्यवसाय सध्या महिनाभर बंद आहेत. मागील वर्षातही लॉकडाऊनचा सामना सर्व व्यावसायिकांना करावा लागला. या सर्वांची आर्थिक घडी सुरळीत होत असताना दुसरी लाट आल्याने आता बँकांच्या हप्त्यासह घराचे, दुकानाचे भाडे भरायचे तरी कसे? असा प्रश्न भाडेकरुंना सतावत आहे. बऱ्याच घरमालकांनी कठोर भूमिका घेतल्याने भाडेकरू हादरले आहेत. शासनाने व स्थानिक प्रशासनाने मागील वर्षी घरमालकांना लॉकडाऊन काळातील भाडे न आकारण्याचे आवाहन केले होते. यंदा तसे कोणतेही आवाहन नाही, की कोणाला कसल्याही प्रकारची सवलत नाही.
चौकट
जिल्ह्यातील घरांच्या मालकीची स्थिती
(२०११ च्या जणगणनेनुसार)
जिल्ह्यातील कुटुंबांची एकूण संख्या ५,८५,२२७
मालकीच्या घरात राहणारी कुटुंबे ४,९८,६१३
भाड्याच्या घरात राहणारी कुटुंबे ६७ हजार ३०१
झोपडपट्टी व इतर १९,३१३
कोट
शासनाला दुकाने बंदच करायची आहेत, तर त्यांनी लॉकडाऊन काळातील दुकानभाडे न आकारण्याचे आवाहन करावे, अन्य सवलती द्याव्यात.
गेली वर्षभर व्यापार विस्कळीत झाल्याने भाडे भरण्यास अनेकजण असमर्थ झाले आहेत.
-समीर शहा, अध्यक्ष व्यापारी एकता असोसिएशन
कोट
गोरगरीब भाडेकरुंचा रोजगार सध्या बंद आहे. त्यांना भाडे भरणे कठीण जात आहे. काही घरमालक सामंजस्यपणाने त्यांना समजून घेत आहेत, तर काही घर सोडण्याची सूचना करीत आहेत. सद्यस्थितीत घरमालकांनी थोडे समजून घ्यावे व शासनाने अशा गोरगरिबांना थोडी मदत करावी.
- शंकर पुजारी, अध्यक्ष जिल्हा निवारा संघटना, सांगली
कोट
गेल्या वर्षभरापासून आमचा व्यावसाय विस्कळीत झाला आहे. चालू वर्षी तो रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच पुन्हा लॉकडाऊन झाला. अशावेळी दुकानाचे, घराचे भाडे भरणे आमच्यासारख्या सामान्य लोकांना कसे शक्य आहे. शासन याचा विचार करणार आहे की नाही? - सुनील माने, भाडेकरू
कोट
मागील वर्षी आम्ही काहीप्रमाणात सवलत दिली होती. भाडेकरुंनीही थोडे थोडे करून भाडे दिले. त्यामुळे घरमालक व भाडेकरुंनी सामंजस्याने यातून मार्ग काढला पाहिजे.
- रुबाबबी अत्तार, घरमालक