व्यापाऱ्यांचे गाळे काढून घेणार

By Admin | Updated: April 26, 2017 23:49 IST2017-04-26T23:49:44+5:302017-04-26T23:49:44+5:30

आज नोटिसा : कांदा-बटाटा व्यापाऱ्यांवर बाजार समितीची कारवाई

To remove trade slots | व्यापाऱ्यांचे गाळे काढून घेणार

व्यापाऱ्यांचे गाळे काढून घेणार



सांगली : विष्णुअण्णा फळ मार्केटमधील कांदा-बटाटा व्यापारी आणि बाजार समिती कर्मचारी यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने तीस व्यापाऱ्यांना फळ मार्केटमधील गाळे काढून घेण्याच्या नोटिसा गुरुवारी दिल्या जाणार आहेत. व्यापाऱ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी वॉलमार्टच्या आवारात व्यापार स्थलांतरित करीत मालाची विक्री केली.
येथील फळ मार्केटमध्ये सोमवारी सकाळी कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा आलेला माल उतरविण्यासाठी मालवाहतूक ट्रक रस्त्यावर लावण्यात आला होता. चार दिवसांपासून फळ मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असल्याने त्या वाहनांची भर पडली आहे. कांदा व्यापाऱ्यांचा ट्रक बाजूला करण्यात यावा, अशी विनंती बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी केली. मात्र ट्रक बंद पडला असल्याने तो काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यातून वाद टोकाला गेला.
बाजार समितीकडून कांदा-बटाटा व्यापाऱ्यांना प्रत्येक गाळ्यासाठी एक रुपया भाडे आकारले जाते. चार महिन्यांपूर्वी महिन्याला अडीच हजार रुपये भाडे करण्यात येणार असल्याची नोटीस पाठविली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कांदा, बटाटा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून बाजाराचे स्थलांतर केले आहे. वॉलमार्टच्या आवारामध्ये सलग दुसऱ्यादिवशी व्यापार नेण्यात आला. व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे कांदा-बटाटा व्यापाऱ्यांकडे असलेले तीस गाळे काढून घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. त्याबाबतची नोटीस गुरुवारी व्यापाऱ्यांना दिली जाणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, फळ मार्केटचे सभापती अजित बनसोडे आणि बाजार समिती सचिव पी. एस. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाद पेटला
विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये बाजार समितीकडून मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, म्हणून कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून, सांगली-कोल्हापूर रस्त्यावर वॉलमार्टच्या आवारात व्यापार स्थलांतरित केला आहे. दुसऱ्या दिवशीही येथे कांदा आणि बटाट्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. व्यापाऱ्यांनी बाजाराचे स्थलांतर केल्यामुळे बाजार समिती प्रशासनानेही कारवाईचा इशारा दिला आहे. व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये तोडग्याऐवजी संघर्ष टोकाला जात आहे.

Web Title: To remove trade slots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.