जात दाखल्यासाठीच्या अटी शिथिल करा
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T23:07:17+5:302014-11-11T23:17:03+5:30
बहुजन युवा ब्रिगेडची मागणी : सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जात दाखल्यासाठीच्या अटी शिथिल करा
सांगली : जातीच्या दाखल्यासाठी ५० वर्षांपूर्वीची असलेली अट शिथिल करावी, यासह विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) बहुजन युवा ब्रिगेड महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये, जातीच्या दाखल्यासाठी १९५० पूर्वीची अट शिथिल करावी, दारिद्र्य रेषेखालील यादीचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे, रेशनवरील रॉकेल व धान्य कोटा वाढवून मिळावा, विकास महामंडळाच्या किचकट अटी शिथिल कराव्यात, महिलांसाठी रोजगार उपलब्ध करावा, वयोवृध्द कलाकारांना पाच हजार मानधन द्यावे, घरकुल योजनेचा सर्वांना फायदा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आली. आंदोलनामध्ये कुमार शितोळे, दत्ता नलवडे, समीर देसाई, दत्तात्रय दुर्गाडे, बापू भाजीवाले, राजेश जाधव, श्रीकांत भोरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)