तासगावात राजकीय संघर्षाचा पुनश्च हरिओम
By Admin | Updated: August 4, 2015 00:07 IST2015-08-03T23:53:02+5:302015-08-04T00:07:51+5:30
आबा-काका गटात सामना : कुरघोडीतून तोडफोडीकडे वाटचाल; सत्तासंघर्षाचे राजकारण पेटले

तासगावात राजकीय संघर्षाचा पुनश्च हरिओम
दत्ता पाटील - तासगाव तालुक्याला राजकीय संघर्ष नवा नाही. तो थांबलाही नाही. आबा गट आणि काका गटाचे हाडवैर उभ्या राज्याला परिचित आहे. मध्यंतरीच्या काही वर्षात तोडफोडीऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरु होते. आर. आर. पाटील यांच्या पश्चात हा संघर्ष थांबेल, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच, बाजार समितीच्या निमित्ताने संघर्षाचा पुनश्च हरिओम झाला. पुन्हा कुरघोडीच्या राजकारणाने तोडफोडीचा धरलेला मार्ग अराजकतेच्या दिशेने जाणार आहे. या संघर्षाची सुरुवात कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर उघड गुपित असले तरी, ते जाहीर होणार नाही. मात्र भविष्यात मतमेटीतून सूज्ञ मतदार ते व्यक्त करेल हे निश्चित.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानादिवशीच आबा गट आणि काका गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली. हा हल्ला विरोधकांनीच केल्याचे दोन्ही गटांकडून अजूनही सांगितले जात आहे. हा दंगा राजकारणाच्या फडात पडलेली एक ठिणगी आहे. या ठिणगीचा भडका उडणार, हे सांगायला आता कोणा तत्त्ववेत्त्याची गरजही नाही. संघर्षाची सुरुवात कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर नेते आणि कार्यकर्त्यांसाठी उघड गुपित आहे. त्याची कबुली कोणी देणार नाही. मात्र प्रत्येक निवडणुकीसाठी ज्यांच्या दारात जावे लागणार आहे, अशा सामान्य मतदाराला त्याची जाणीव निश्चितच आहे. आगामी काळात तेही मतपेटीतून त्यांची भूमिका व्यक्त करतीलच.
तासगाव तालुक्याला संघर्ष नवा नाही. आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांची राजकीय सुरुवातच संघर्षातून झाली. त्यानंतर हा संघर्ष गावपातळीपासून तालुका, जिल्हा आणि राज्यापर्यंत पोहोचला. या संघर्षांवर कधी राजकीय पोळी भाजली गेली, तर कधी कार्यकर्त्यांच्या आयुष्याची होळी केली गेली. मध्यंतरीच्या काळात आर. आर. पाटील आणि संजय पाटील यांनी आश्चर्यकारक राजकीय तंटामुक्ती केली. दोन्ही नेते एकत्रित आल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. संघर्षाने कुरघोडीचे राजकीय वळण घेतले. काही वर्षातच पुन्हा दोन्ही नेत्यांचे मार्ग वेगळे झाले. मात्र संघर्ष अद्याप सुरु झाला नव्हता. त्यातच एका गटाचे नेतृत्व करणारे आर. आर. पाटील यांचे निधन झाले. उभा संघर्ष असणाऱ्या दोन सेनापतींपैकी एका सेनापतीची एक्झिट झाली. त्यामुळे तालुक्यात दोन गट कायम राहिले तरी, सेनापती एकाच गटाकडे राहिला होता. त्यामुळे पुन्हा संघर्ष होणार नसल्याचा अंदाज काही महिन्यांतच फोल ठरला. पुन्हा नव्या राजकीय वळणावर तासगाव तालुक्याचे राजकारण येऊन ठेपले आहे.
एकीकडे कार्यकर्त्यांच्या भरवशावर राजकीय वाटचाल सुरु करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवख्या आमदार सुमनताई पाटील आणि दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे खासदार संजय पाटील, या दोन भिन्न टोकांवर तालुक्याचे राजकारण वाहवत जाणार आहे. ते विकासासाठी संघर्ष करणारे असेल, की सत्तेसाठी संघर्ष करणारे असेल, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
खासदारांकडून अपेक्षा?
खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभा निवडणुकीत तासगाव तालुक्यातून तब्बल ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यांच्याविरोधात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रचार करुन देखील आबा गटातील कार्यकर्त्यांनीदेखील खासदारांवर विश्वास दाखवला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आर. आर. पाटील यांनाही तालुक्यातून १३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या दोन्ही नेत्यांना मताधिक्य मिळवून देणारी कॉमन जनता आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तालुक्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ही पोकळी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून भरुन निघेल, अशी अपेक्षा खासदार पाटील यांचे कार्यकर्ते नसणाऱ्यांनाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराज गटाने खासदार गटाशी हात मिळवणीदेखील केली होती. खमक्या नेतृत्वाच्या आश्रयाला येण्यासाठी राष्ट्रवादीतील काही कार्यकर्ते इच्छुक होते. शनिवारी झालेल्या दंग्यानंतर मात्र राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची मानसिकताच बदलून गेल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही तालुक्यातील सामान्य जनतेला खासदार पाटील यांच्याकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता संघर्षातून होणार नाही. हा संघर्ष इथेच थांबविण्यासाठी काकांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कुरघोडीतून तोडफोडीकडे
आबा-काका गट एकत्रित असताना तालुक्यात कुरघोडीचे राजकारण सुरुच होते. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काका गटाने आबा गटाचे दोन उमेदवार पाडून काका समर्थक दोन अपक्ष उमेदवारांना निवडून आणले. त्यानंतर जिल्हा परिषद निडणुकीत मणेराजुरी जिल्हा परिषद गटात आबा गटाने काका गटाचा एक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन उमेदवार पाडले. नंतरच्या काळात खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही गटाचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर नगरपालिकेत आबा गटाच्या नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काका गटाने प्रयत्न सुरु केले. त्यानंतर आबा गटानेही काका गटाच्या पंचायत समितीच्या उपसभापतींवर अविश्वास ठराव आणला. आता या कुरघोड्यांनी तोडफोडीकडे वाटचाल सुुरु केली आहे.