पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:17+5:302021-04-12T04:24:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव जॅकवेल आणि आळसंद जलशुद्धिकरण केंद्राचा वीज पुरवठा ...

पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव जॅकवेल आणि आळसंद जलशुद्धिकरण केंद्राचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणने या योजनेसाठी स्वतंत्ररीत्या वीज पुरवठा अखंडित करावा, अशी मागणी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी केली आहे. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे.
विटा शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यातील घोगाव येथील कृष्णा नदीपात्रात जॅकवेल तयार आहे. तेथून विद्युत पंपाद्वारे पाणी उचलून आळसंद येथील जलशुद्धिकरण केंद्रात टाकले जाते. तेथून पुन्हा विद्युत पंपाद्वारे पाणी शहरात पोहोचत आहे.
परंतु, गेल्या काही महिन्यांपासून घोगाव जॅकवेल व आळसंद जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यास नगरपालिकेला मोठी अडचण निर्माण झाली आहे. महावितरणने विटा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र विद्युत प्रवाह जोडून देऊन अखंडित वीज द्यावी, अशी मागणी महावितरणकडे केली. या मागणीचे पत्र माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, अॅड. धर्मेश पाटील व विनोद पाटील यांनी सांगलीचे महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना दिले.
यावेळी पेठकर यांनी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करून अखंडित वीज पुरवठ्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू, अशी ग्वाही दिली.