पालिकेत पुन्हा लाल फितीचा कारभार

By Admin | Updated: November 11, 2014 00:01 IST2014-11-10T22:53:56+5:302014-11-11T00:01:54+5:30

परवाने रखडले : अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होते अडवणूक

The red tumble again in the municipality | पालिकेत पुन्हा लाल फितीचा कारभार

पालिकेत पुन्हा लाल फितीचा कारभार

सांगली : ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे हत्यार उपसून, कानउघाडणी करून आयुक्तांनी केलेले सर्व प्रयत्न आता फोल ठरले आहेत. बांधकाम परवान्यासाठी अजूनही नागरिकांची अडवणूक तिन्ही शहरातील कार्यालयातून होत आहे. अन्य विभागातही अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे.
बांधकाम परवान्यांची कामे जलदगतीने व्हावीत म्हणून आयुक्त अजिज कारचे यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. जागेच्या क्षेत्रफळानुसार सह्यांचे अधिकार निश्चित केले. नागरिकांना, बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवान्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून त्यांनी यंत्रणेत काही बदल केले. शहरातील बांधकाम व्यावसायिक, अभियंते, आर्किटेक्ट यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्याही सूचनांचा समावेश यंत्रणा बदलावेळी करण्यात आला. इतक्या प्रयत्नानंतरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लाल फितीच्या कारभारात किंचीतही फरक पडला नाही. लाचप्रकरणी यापूर्वी कर्मचाऱ्यांना पकडल्यानंतरही यंत्रणेतील भ्रष्ट कारभार बंद होऊ शकला नाही. सांगली व मिरजेत आजही बांधकाम परवान्याच्या फायली दोन, अडीच महिने नुसत्याच फिरत आहेत. नागरिकांचे हेलपाटे वाढविण्याचे काम आजही इमानेइतबारे सुरू आहे.
लाल फितीच्या या कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. काही बड्या बांधकाम व्यावसायिकांचे परवाने जलदगतीने देण्यात येतात. अशा जलदगती कारभारालाही अर्थपूर्ण कारण चिकटले आहे. सर्वसामान्यांच्या फायलींना झिडकारण्याचे काम या प्रक्रियेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साखळीकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The red tumble again in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.