पाण्याचा पुनर्वापर : बचतीबरोबर हवा जलसंधारणावर भर !
By Admin | Updated: July 26, 2014 00:31 IST2014-07-26T00:29:20+5:302014-07-26T00:31:02+5:30
लोकमत इनिशिएटिव्ह

पाण्याचा पुनर्वापर : बचतीबरोबर हवा जलसंधारणावर भर !
सांगली : जिल्ह्याला वरदान ठरलेल्या चांदोली (वारणा) धरणाने जून महिन्यात प्रथमच तळ गाठला होता. शेतीच्या पाणी वापरावर बंदी घालण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि ते साठवले नाही, तर भविष्यात यावर्षीपेक्षाही भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय सोडण्याची गरज आहे. जिल्ह्यातील काही गावांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यातूनच प्रेरणा घेण्याची गरज आहे. काही गावे दुष्काळातही ‘पाणीदार’ होती. या गावांनी केलेल्या जलसंधारणातील कामांचा आदर्श आपणही घेण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात चांदोली (वारणा) हे एकमेव धरण आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात असले तरी, कृष्णा नदीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याच्या ५० टक्के भागाला त्याचा फायदा होतो. मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे चांदोली आणि कोयना या दोन्ही धरणांनी तळ गाठला होता. कोयना धरण प्रथमच कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्यातील अनेक गावांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता होती. पाणीटंचाईचे प्रश्न निर्माण झाले की, प्रशासन, राज्यकर्ते आणि आपणही निसर्गाच्या लहरीपणाकडे बोट दाखवून हात वर करण्यात धन्यता मानतो. मात्र, संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी माझ्या गावाने काही तरी केले पाहिजे, याची प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गार्डी, सांगोले, रेणावी, बेणापूर, कडेगाव तालुक्यातील शाळगाव, वांगी या गावांनी जलसंधारणाचे आदर्श प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे दुष्काळातही या गावांना पाणीटंचाई जाणवली नाही. या ‘पाणीदार’ गावांनी पाणीटंचाईवर कशी मात केली, याची माहिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. पाणी बचतीबाबत अनेकवेळा चर्चा होते, विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरु झाला की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे.
सामूहिक जबाबदारी
-सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा
-येत्या पावसाळ्यात मोठमोठ्या चरी घेऊन पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्या
-जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे
-नैसर्गिक जलस्रोत व टेकांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून आपली ओळख जपा
वैयक्तिक जबाबदारी
-ग्रामस्थांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा
-अंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे
-नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी
-शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देताना अतिरिक्त पाणी देऊ नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे
अंघोळ
-बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर ४शॉवरखाली : १०० लिटर
दाढी
-नळ सोडून दाढी केल्यास : १० लिटर
-मग घेऊन : १ लिटर
ब्रश
-नळ सोडून केल्यास : १० लिटर
-मग घेऊन : १ लिटर
कपडे
-नळाखाली : ११६ लिटर
-बादलीचा वापर : ३६ लिटर
मोटार
४पाईप वापरल्यास : १०० लिटर
-बादलीचा वापर : १८ लिटर
हात धुण्यासाठी
-नळाखाली : १० लिटर
-मग घेऊन : अर्धा लिटर
शौचविधी
-फ्लश केल्यास : २० लिटर
-बादलीचा वापर : ६ लिटर
ग्रामस्थांनो, लक्षात ठेवा
खरं तर आपण पाण्याची काटकसर करत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या अमर्याद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.