बनावट सहीद्वारे सफाई कामगारांची पालिकेत भरती

By Admin | Updated: August 9, 2014 00:29 IST2014-08-08T23:53:26+5:302014-08-09T00:29:23+5:30

स्थायी समितीत आरोप : फौजदारी दाखल करण्याचे आदेश

Recruitment of clean workers by fake signature | बनावट सहीद्वारे सफाई कामगारांची पालिकेत भरती

बनावट सहीद्वारे सफाई कामगारांची पालिकेत भरती

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मानधनावरील सफाई कामगारांना कामगार अधिकाऱ्यांच्या बनावट सहीने नियुक्ती आदेशपत्रे देण्यात आल्याचा आरोप आज, शुक्रवारी स्थायी समिती सभेत करण्यात आला. या प्रकारामुळे सभेत खळबळ उडाली. कामगार अधिकाऱ्यांनीही नियुक्ती आदेश पत्रावरील सह्या आपल्या नसल्याचे स्पष्ट केल्याने सफाई कामगारांच्या भरतीतील घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश सभेत देण्यात आले.
पालिकेकडे ४०० सफाई कामगार मानधनावर घेण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात पालिकेकडून ४३५ कामगारांचे वेतन काढले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता यातील काही कामगारांच्या नियुक्ती आदेश पत्रावर कामगार अधिकाऱ्यांची सही नसल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती सभेत काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विष्णू माने या सदस्यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला. नियुक्ती पत्राची सत्यपत्र (झेरॉक्स) काढून त्यावर बनावट सही करून सफाई कामगारांना मानधनावर घेण्यात आल्याचा आरोपही सदस्यांनी केला. कामगार अधिकारी के. सी. हळिंगळे यांनीही वादग्रस्त नियुक्तीपत्रावरील सही आपली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता सफाई कामगार भरतीत गोलमाल झाल्याचे उघड झाले आहे. शिवाय ५५ जादा कर्मचाऱ्यांवर उधळपट्टी सुरू असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. अखेर याप्रकरणी चौकशी करून स्थायी सभेकडे अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती राजेश नाईक यांनी दिले. तसेच बेकायदा नियुक्तीपत्र घेतलेल्या कामगारांवर फौजदारी करण्याबरोबरच वाढीव कर्मचाऱ्यांकडील पगाराची रक्कम वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले.
सफाई कामगारांपैकी ७२ जण पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना परत सफाईच्या कामावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते; पण त्यातील अनेक कर्मचारी मूळ जागेवर जाण्यास तयार नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्याजागी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेशही सभापतींनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Recruitment of clean workers by fake signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.