‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी दीडपट पाणीपट्टी वसुली!
By Admin | Updated: April 13, 2015 00:09 IST2015-04-12T23:48:10+5:302015-04-13T00:09:07+5:30
मागणीस प्रतिसाद नाही : पंचनामे करून जादा आकारणी

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी दीडपट पाणीपट्टी वसुली!
मिरज : म्हैसाळचे पाणी सहाव्या टप्प्यात पोहोचले तरी, पाणी मागणीस प्रतिसाद नसल्याने लाभक्षेत्रातील पिकांचे पंचनामे करून दीडपट पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आज डोंगरवाडी योजनेचे पंप सुरू करण्यात आले असून, डोंगरवाडी योजनेचे दि. १७ रोजी उद्घाटन होणार आहे.
म्हैसाळ योजनेचे ४३ पंप सुरू असून, पाणी सहाव्या टप्प्यात कवठेमहांकाळ तालुक्यात पोहोचले आहे. ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू राहण्यासाठी पाणी मागणी नोंदविण्याचे आवाहन सुरू आहे. मात्र अद्याप पाणी मागणीस प्रतिसाद मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’चे पहिल्या टप्प्यात दहा, दुसऱ्या टप्प्यात बारा, तिसऱ्या टप्प्यात दहा व चौथ्या टप्प्यात आठ व पाचव्या टप्प्यातील तीन असे ४३ पंप सुरू आहेत. लिंगनूर, आरग, कळंबी शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचले तरी, पाणी मागणी नोंद अद्याप झालेली नाही. पाणी मागणीस प्रतिसाद नसल्याने आवर्तन सुरू ठेवण्यासाठी म्हैसाळ कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिकांचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय पंचनामे करून दीडपट पाणी आकारणी करण्यात येणार असल्याचे ‘म्हैसाळ’चे उपअभियंता एस. के. नलवडे यांनी सांगितले. पाचव्या टप्प्यातून जतपर्यंत पाणी सोडण्यात येणार असून, जत व कवठेमहांकाळ तालुक्यातूनही पाणी मागणीला प्रतिसाद नसल्याने पाणीपट्टी वसुलीसाठी ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. चौथ्या व पाचव्या टप्प्यादरम्यान हनुमान खिंडीतून डोंगरवाडी योेजनेचे तीन पंप सुरू केले असून, उद्यापर्यंत खंडेराजुरी तलावात पाणी पोहोचणार आहे. खंडेराजुरी तलाव भरल्यानंतर चार दिवसात डोंगरवाडी योजनेच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे. डोंगरवाडी योजना सुरू झाल्यामुळे सोनी, भोसेसह चौदा गावांत पाणी पोहोचणार आहे. (वार्ताहर)