दिवसात एक कोटीचा एलबीटी वसूल

By Admin | Updated: February 21, 2015 23:59 IST2015-02-21T23:58:53+5:302015-02-21T23:59:09+5:30

व्यापाऱ्यांची सहकार्याची भूमिका : महापालिकेचाही प्रतिसाद, कारवाईचे हत्यार म्यान

Recovery of one crore LBT in a day | दिवसात एक कोटीचा एलबीटी वसूल

दिवसात एक कोटीचा एलबीटी वसूल

सांगली : एलबीटीप्रश्नी महापालिकेच्या एका दिवसातील कारवाईनंतर शहरातील व्यापाऱ्यांनी असहकाराऐवजी सहकार आंदोलन पुकारून आज, शनिवारी एका दिवसात तब्बल १ कोटी १० लाख रुपये महापालिकेच्या पदरात कररूपाने टाकले. कर भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आज एलबीटी विभागात दिसून आले. व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे महापालिकेनेही कारवाईचे हत्यार शनिवारी म्यान केले.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात दीड वर्षापूर्वी एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून महापालिका व व्यापाऱ्यांतील संघर्ष कायम आहे. एलबीटीविरोधी कृती समितीने कर भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र महापालिकेने एलबीटीच्या वसुलीसाठी कडक पावले उचलली. सुमारे ५३ व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली, तर दीडशे व्यापाऱ्यांच्या कागदपत्रे तपासणीच्या हालचाली सुरू होत्या. फौजदारी कारवाईविरोधात यापूर्वी व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण हाती घेतले होते.
शुक्रवारी महापालिकेने दुकान तपासणीच्या कारवाईला सुरुवात केल्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. बेमुदत व्यापार बंदचा इशाराही दिला होता. शनिवारी पुन्हा चित्र पालटले. दिवसभरात एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. एलबीटीअंतर्गत नोंदणी करूनही कर न भरलेल्या २५९ व्यापाऱ्यांनी आज १ कोटी १० लाख ५ हजार रुपये जमा केले.
एका दिवसातील इतक्या मोठ्या करवसुलीने महापालिकेची चालू आर्थिक वर्षातील एकूण एलबीटी वसुली आता ३६ कोटींवर गेली आहे. काही व्यापाऱ्यांनी चलने नेली, तर काहींनी विवरणपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे फेब्रुवारीअखेर महापालिकेच्या एलबीटीची मोठी वसुली होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Recovery of one crore LBT in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.