आवक घटल्याने बेदाण्यास विक्रमी दर

By Admin | Updated: August 8, 2014 00:41 IST2014-08-07T22:13:51+5:302014-08-08T00:41:14+5:30

अवकाळीचा दणका : तिप्पट दर

The recordable rate of pledging due to inward drop | आवक घटल्याने बेदाण्यास विक्रमी दर

आवक घटल्याने बेदाण्यास विक्रमी दर

सांगली : अवकाळी पावसाचा दणका, गतवर्षी मिळालेला कमी दर यामुळे यावर्षी बेदाण्याची आवक निम्म्यावर आली. परिणामी यंदा बेदाण्याला विक्रमी दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत हा दर तिपटीने अधिक आहे. बेदाण्याचा हंगाम संपला असला तरीही अद्याप येथील मार्केट यार्डमध्ये आवक सुरूच आहे.
सांगलीमध्ये परिसरासह सोलापूर व कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातून बेदाण्याची आवक होते. हे चार जिल्हेच बेदाण्याचे प्रमुख उत्पादक आहेत. या परिसरातून संपूर्ण देशभर व परदेशातही बेदाण्याची निर्यात होते. येथील मार्केट यार्डमध्ये सर्वसाधारणपणे दररोज १४० ते १६० टन बेदाण्याची आवक होत असते. यावर्षी मात्र ही आवक जवळपास ९० टनावर आली आहे. प्रत्येकवर्षी सुमारे पंधरा ते सोळा हजार टन बेदाण्याची आवक होते. यावर्षी आजपर्यंत सुमारे नऊ हजार टन बेदाण्याची आवक झाली आहे.
यावर्षी अवकाळी पावसाचा तडाखा सोलापूरसह सांगली, विजापूर व बेळगाव जिल्ह्याला बसला आहे. यामुळे यंदा उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर गतवर्षी बेदाण्याला ८० ते १२० रुपये किलो दर मिळाला होता. गतवर्षी दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी बेदाणा उत्पादनाकडे पाठ फिरवल्यामुळे यावर्षी आवक मोठ्या प्रमाणात घटली. २०१२ मध्ये ६० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. दर चांगला न मिळाल्याने २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने यंदा बाजारात बेदाण्याची आवक कमी झाली. यामुळे यंदा २०० ते ३०० रुपये किलो इतका विक्रमी दर मिळाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा दर जवळपास तिप्पट आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The recordable rate of pledging due to inward drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.