सात दिवसात विक्रमी एक हजार २५२ मिलीमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:31+5:302021-07-28T04:27:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : चांदोली धरण परिसरात सात दिवसात विक्रमी एक हजार २५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, ...

सात दिवसात विक्रमी एक हजार २५२ मिलीमीटर पावसाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसरात सात दिवसात विक्रमी एक हजार २५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर २३ जुलैला तब्बल ५७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात २२ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत होता. पावसाने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. ओढ्यानाल्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. सोनवडे, आरळा, मराठवाडी या गावांना पुराने वेढा घातला होता. ठिकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मणदूरमध्ये ओढ्यांचे पाणी गावात घुसून घरांची पडझड झाली आहे. साकव तुटून गेला, जमिनी वाहून गेल्या, झाडे उन्मळून पडली. ओढ्यानाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत होते.
शेतातील पिके वाहून गेली. बांध, नाली तुटल्याने नुकसान झाले. सोनवडे, काळोखेवाडी, मिरूखेवाडी, मणदूर, गुढे, येथील डोंगर खचले. उखळू (ता. शाहूवाडी) येथील डोंगर खचून एक वयोवृद्धा वाहून गेली. पण लोकांनी तिला वाचविले. शित्तूर, ढवळेवाडी, कदमवाडी, शिराळे, सोंडोली येथील डोंगर खचले. आख्खे डोंगर खाली सरकले आहेत.
मुसळधार अतिवृष्टीत महापुराने एका रात्रीत हाहाकार माजला होता. आरळा येथील अख्खी बाजारपेठ पाण्यात होती. मराठवाडी पाण्यात होती. सोनवडेतील सखल भागातील घरे पाण्यात होती. काही घरांची पडझड झाली आहे. ओढ्याकाठची व नदीकाठची पिके गाळाने बुजली आहेत.
२२ ते २६ जुलैपर्यंत संपूर्ण परिसर अंधारात होता. मोबाइल सेवा बंद होती. रस्त्यावर पाणी, वाहतूक बंद त्यामुळे संकटातही लोक जीव मुठीत घेऊन दिवस ढकलत होते. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. आता लोकप्रतिनिधी या भागांची पाहणी करताहेत. लोकांना धीर देत आहेत. पण नुकसानभरपाई तातडीने मिळणे गरजेचे आहे.
फोटो : २७ वारणावती १
ओळ : सोनवडे (ता. शिराळा) येथील घरांची पडझड झाली आहे.