वाळव्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाखेस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:02+5:302021-06-20T04:19:02+5:30
वाळवा : वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी. काॅम-१ व एम. एस्सी. रसायनशास्त्र या विषयाचे ...

वाळव्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाखेस मान्यता
वाळवा : वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी. काॅम-१ व एम. एस्सी. रसायनशास्त्र या विषयाचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती संस्था अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली.
ते म्हणाले, क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी १९४९ मध्ये किसान शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हुतात्मा किसन अहिर विद्यालयाची सुरुवात केली. आज संस्थेचे प्राथमिक शिशुविहार विद्यालय, अकॅडमी, पाच विद्यालये, महाविद्यालय, वसतिगृहे, नर्सिंग काॅलेज अशा शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत. त्यातील एक महत्त्वाची शाखा म्हणजे महाविद्यालय होय.
नाना पाटील यांचे जिवंत स्मारक म्हणून १९९२ मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाने रौप्य महोत्सव वर्ष पार केले आहे. शिवाजी विद्यापीठात एक वेगळी नाममुद्रा तयार केली आहे. महाविद्यालय तीन वेळा नॅक मूल्यांकनास सामोरे गेले आहे. आतापर्यंत महाविद्यालयात कला व विज्ञान विभाग सुरू होता. यंदा वाणिज्य विभाग सुरू झाला आहे, तसेच रसायनशास्त्र विषयातील एम.एस्सी. पदवीतर शिक्षणाची सोय केली आहे. याकामी विद्यापीठ व शासन स्तरावर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सावंत यांनी विशेष बाब म्हणून या विभागाला मान्यता दिली आहे असे ते म्हणाले.