‘अष्टलिंग’च्या ठेवी मिळाल्या

By Admin | Updated: October 17, 2014 22:16 IST2014-10-17T21:50:52+5:302014-10-17T22:16:49+5:30

ठेवीदारांना दिलासा : प्रशासक, अवसायक, बचाव समितीच्या प्रयत्नांना यश

Received 'Ashtling' deposits | ‘अष्टलिंग’च्या ठेवी मिळाल्या

‘अष्टलिंग’च्या ठेवी मिळाल्या

सुरेंद्र शिराळकर - आष्टा -येथील अष्टलिंग नागरी सह. पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. संस्थेत साडेपाच कोटीच्या ठेवी होत्या. २00३ अखेर त्या व्याजासह ९ ते १0 कोटी झाल्या. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून अनेक तीव्र आंदोलने झाली. प्रशासक मंडळ, अवसायक मंडळ, अष्टलिंग बचाव समिती यांनी केलेल्या प्रयत्नामुळे १९ वर्षात ठेवीदारांना साडेआठ ते नऊ कोटीच्या ठेवी परत दिल्या आहेत. अवसायक मंडळाने गुढीपाडवा व दीपावलीस संस्थेसमोर आठ दिवस अगोदर बोर्ड लावून हजारो ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणले जात असतानाच, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात सहकाराची बीजे रोवली गेली. मोठ्या बँकांसह, पतसंस्था, सोसायट्यांचे जाळे विणले गेले. आष्ट्यात सहकार वाढीस लागला असतानाच १९९५ मध्ये अष्टलिंग नागरी सह. पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी अडीच कोटीचा अपहार करीत सभासदांच्या विश्वासाला तडा दिला.
हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात म्हणून प्रखर आंदोलन केले. शासनाचे संचालक मंडळ बरखास्त करीत ठेवीदार बचाव समिती सदस्यांचे प्रशासक मंडळ नेले. २00१ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. मात्र हे संचालक अपहारकर्त्या संचालकांनाच मदत करीत असल्याचे सिध्द झाल्याने संचालकांनी राजीनामा दिला.
२00२ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन संचालक मंडळ अस्तित्वात आले. मात्र या संचालकांनी मृत ठेवीदारांचे खोटे अंगठे उठवून पैसे घेतल्याचे सिध्द झाले. ठेवीदारांनी ८३ दिवस ठिय्या आंदोलन केल्यानंतर ३0 सप्टेंबर २00३ ला संचालक मंडळ बरखास्त करीत जिल्हा उपनिबंधकांनी संस्था अवसायनात काढली व अवसायक म्हणून वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांनीही कर्जदारांना बेकायदेशीर सूट दिल्याने त्यांची बदली करण्यात आली.
यानंतर सहाय्यक रजिस्ट्रार, इस्लामपूर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करुन अष्टलिंग बचाव समितीचा एक प्रतिनिधी अवसायक मदतनीस म्हणून नेमण्यात आला. राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीवर मर्यादा येऊ लागल्या. अखेर जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेवर अवसायक मंडळ नेमले. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक उपनिबंधक, इस्लामपूर सचिन गायकवाड यांची, तर अष्टलिंग बचाव समितीचे अमोल पाटील, राजाराम पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. २0१0 ते २0१४ अखेर अवसायक यांनी ४५ लाख रुपये ठेवीदारांना परत दिले आहेत.
१९९५ पासून ९ ते १0 कोटींच्या ठेवींपैकी आठ ते साडेआठ कोटीच्या ठेवी परत करण्यात अवसायकांना यश मिळाले आहे. गेली १९ वर्षे अमोल पाटील यांनी प्रशासक मंडळ, मदतनीस, विशेष वसुली अधिकारी, अवसायक मंडळ याठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून विनामोबदला काम केले आहे.
जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपनिबंधक सचिन गायकवाड, अमोल पाटील, राजाराम पवार यांनी ठेवीदारांच्या लाखोंच्या ठेवी पुन्हा मिळवून देत त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. हजारो ठेवीदारांनी मुला—मुलींचे शिक्षण, नोकरी, लग्न, घरासाठी ठेवलेले पैसे परत देऊन, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले.

Web Title: Received 'Ashtling' deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.