कृषी औषध कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी
By Admin | Updated: November 27, 2014 00:19 IST2014-11-26T22:51:35+5:302014-11-27T00:19:20+5:30
शेतकऱ्यांची मागणी : फसव्यांवर कारवाई करा

कृषी औषध कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी
टाकळी : विविध पिकांच्या रोगांवर हमखास नियंत्रणाचे फसवे दावे करणाऱ्या कृषी औषध कंपन्यांवर कारवाई करून, दावण्या व अन्य रोगांमुळे द्राक्ष उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची व नुकसानभरपाई देण्याची मागणी टाकळी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
टाकळीसह परिसरात ६० टक्के द्राक्ष बागायती क्षेत्र आहे. त्यापैकी ७५ टक्के द्राक्षबागांवर अवकाळी पाऊस, हवामान बदल व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. रोगांवर हमखास नियंत्रणाचे फसवे दावे करणाऱ्या औषध कंपन्यांची महागडी औषधे फवारणी करूनही रोग नियंत्रणात आले नाहीत. आतापर्यंत एकरी ७० हजारापर्यंत औषध खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. द्राक्ष पिकावरील हमखास रोग नियंत्रणाचे दावे करणारे औषध कंपनीचे प्रतिनिधी, रोगाने बागांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांकडे फिरकलेही नाहीत. औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने औषधांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अशा बोगस दावे करणाऱ्या औषध कंपन्यांवर करवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्याकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आमगोंडा पाटील यांच्यासह पप्पू गुरव, शेखर कुरणे, राजू पाटील, हुवगोंडा पाटील, पमू पाटील, गटू पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)