शिराळा मतदारसंघात जो बंडखोर, तोच सिकंदर!
By Admin | Updated: September 11, 2014 23:08 IST2014-09-11T22:26:09+5:302014-09-11T23:08:40+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीला चिंता : धोक्याची घंटा वाजू लागल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा; जयंत पाटील गटाची भूमिका गुलदस्त्यात

शिराळा मतदारसंघात जो बंडखोर, तोच सिकंदर!
सांगली : शिराळा मतदारसंघात जो नेता बंडखोरी करतो, त्यालाच यश मिळते, असे इतिहास सांगतो. आजवरची राजकीय समीकरणेही तसाच बदल झालेला दाखवतात. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक किंवा काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळाली आणि दुसऱ्याने बंडखोरी केली, तर तो बंडखोर किंवा आघाडीला रामराम ठोकून निवडणुकीच्या रणांगणात उतरणारा तिसराच उमेदवार बाजी मारेल काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा पसरू लागल्याने काँग्रेस आघाडीपुढे धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
शिराळा मतदारसंघात नेहमीच बंडखोरी करणाऱ्याच्या कपाळावर विजयाचा गुलाल लागला आहे. सध्या विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांनी निवडणूक लढवणारच, असा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे तिकीट मिळणारच, असे आ. नाईक सांगतात, तर शिराळा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याचे सांगत सत्यजित देशमुख यांनीही ‘यावेळी थांबायचे नाही’ म्हणत नाईकांना आव्हान दिले आहे. दुसरीकडे शिवाजीराव नाईक यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांना पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. मतदारसंघाच्या इतिहासानुसार त्या निवडणुकीत त्यांना यशही मिळाले. त्यामुळे यंदा पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणारा बाजी मारणार की, बंड करणारा निवडून येणार, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करू लागले आहेत. शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४९ गावे येतात. या गावांवर प्रभाव असणाऱ्या नेतेमंडळींत नानासाहेब महाडिक, अभिजित पाटील या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. त्यांनी मागीलवेळी आ. नाईक यांना मदत केली होती. यंदा मात्र या दोघांसह आणखी काही गावांतील नेते शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी असल्याचे सांगतात. त्यातच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील गटाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. परिणामी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ संपलेला नाही. आता बंडखोराच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. परिणामी आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
महायुतीचा उमेदवार निश्चित
महायुतीने शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी निश्चित केल्यामुळे त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ संपलेला नाही.
बंडखोराच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. परिणामी आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण
शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४९ गावे येत असून येथील नेत्यांची भूमिका निर्णायक