अंधश्रध्दाच समाजाच्या ऱ्हासाचे कारण
By Admin | Updated: February 13, 2015 00:46 IST2015-02-13T00:22:29+5:302015-02-13T00:46:21+5:30
शैला दाभोलकर : हणमंतवडिये येथे ‘क्रांतिवीर भगवानराव पाटील’ पुरस्कार प्रदान

अंधश्रध्दाच समाजाच्या ऱ्हासाचे कारण
कडेगाव : देशामध्ये दीडशे वर्षांपासून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याबाबत प्रबोधन होत आहे, परंतु अद्यापही हा दृष्टिकोन समाजामध्ये रुजलेला नाही. अंधश्रध्देमुळेच भारतीय समाजाचा मोठा ऱ्हास झाला आहे. विचार आणि आचार यामध्ये सुसंवाद निर्माण झाला, तरच संस्कारक्षम समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन शैला दाभोलकर यांनी केले.
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथील क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) अकादमीच्यावतीने २०१५ चा ‘क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार’ शैलाताई दाभोलकर यांना आज (गुरुवारी) क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दाभोलकर म्हणाल्या की, विवेकी बाणा, निर्भयपणा आणि विज्ञाननिष्ठा अशा समाजहिताच्या मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. समाजात रुजलेल्या अंधश्रध्देमुळे वर्षानुवर्षे समाजहिताचे नुकसान झाले आहे. हे ओळखून अंधश्रध्देच्या निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अविरत लढा दिला. आपण केवळ शिकलो म्हणजे शिक्षित झालो असे नाही, तर सर्व नीतीमूल्यांची जोपासना करणारेच खरे शिक्षित होत. स्त्रियांनी समाजात निर्भयतेने व आत्मविश्वासाने वावरावे. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून निर्णय घ्यावेत.
यावेळी कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे म्हणाले की, सध्या व्यक्तिद्वेष आणि विचारद्वेषाचे चुकीचे राजकारण चालले आहे. स्वत: धर्मद्वेषाचे आचरण करून समाजापुढे जाऊन धर्मनिरपेक्षतेची भाषणे सांगणारे राजकारणी समाजात तेढ निर्माण करीत आहेत. नरेंद्र मोदी हे एक अवैज्ञानिक, एकांगी व हुकूमशाही नेतृत्व आहे. अशा प्रवृत्तीच्या नेतृत्वामुळे प्रगत लोकशाहीचे अवमूलन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकशाहीला लोककेंद्रित करण्याची भूमिका आता महत्त्वाची आहे. एकछत्री अंमल करू पाहणाऱ्या मोदी यांना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पक्षाची निर्विवाद सत्ता आणून लगाम लावला.
यावेळी कॉम्रेड किरण माने यांचे भाषण झाले. यावेळी अॅड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, स्वा.सै. शाहीर शिवाजीराव पवार, अॅड. अमित शिंदे, चंद्रकांत देशमुखे, सुभाष पवार, इंद्रजित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
द्वेषाचे राजकारण
यावेळी अॅड. असीम सरोदे यांनी देशातील राजकीय वातावरणावर कोरडे ओढले. ते म्हणाले की, देशामध्ये धर्मद्वेषाचे राजकारण करणारे सत्तेवर आले आहेत. काही राजकारण्यांकडून समाजात तेढ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील सुदृढ लोकशाहीचे अशा प्रवृत्तीमुळे अवमूलन वेगाने होत आहे. मात्र प्रत्येकाने विवेकाने वागल्यास अशा प्रवृत्तींचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही.