नातेवाईकांनी झिडकारलेल्या शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत -: दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:15 AM2019-05-15T00:15:24+5:302019-05-15T00:15:56+5:30

आयुष्यातील अनेक धक्के सहन करूनही पुन्हा उभे राहू पाहणारा सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी नात्यांच्या स्वार्थी सुरुंगाने उद्ध्वस्त झाला. त्याच्या हक्काच्या मालमत्तेवर हक्क गाजविणाºया त्याच्याच नातेवाईकांनी त्याला झिडकारून बेवारस केले.

Reacting to the refractory of the farmer rejected by the relatives - The inflammatory reality | नातेवाईकांनी झिडकारलेल्या शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत -: दाहक वास्तव

नातेवाईकांनी झिडकारलेल्या शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत -: दाहक वास्तव

Next
ठळक मुद्देआयुष्याच्या सायंकाळी अनुभवली प्रेमाची ‘सावली’

अविनाश कोळी ।
सांगली : आयुष्यातील अनेक धक्के सहन करूनही पुन्हा उभे राहू पाहणारा सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी नात्यांच्या स्वार्थी सुरुंगाने उद्ध्वस्त झाला. त्याच्या हक्काच्या मालमत्तेवर हक्क गाजविणाºया त्याच्याच नातेवाईकांनी त्याला झिडकारून बेवारस केले. दाहक अनुभव घेत त्याच्या आयुष्याची सायंकाळ प्रेमाच्या शीतल ‘सावली’त गेली. तरीही मुलांच्या आठवणींनी तडफडत तो अखेर मृत्यूच्या बाहुपाशात अडकला.

पलूस येथील रुबाब बाळू मुल्ला (वय ७५) या शेतकºयाच्या आयुष्याची कहाणी मनाला चटका लावून गेली. ते मुल्लाचाचा म्हणून सांगलीच्या निवारा केंद्रात परिचित होते. अत्यंत सधन कुटुंबातले. शेती, घर, सर्व सुविधा अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत्या. अचानक त्यांच्या आयुष्याने कलाटणी घेत त्यांना वेदनांच्या खोल दरीत ढकलले. पत्नीचा मृत्यू झाला. तीन मुलांपैकी एक गेला, दुसरा बेपत्ता, तर तिसरा मुलगा किरकोळ कामे करून स्वत:चे पोट भरत आहे. त्यांचे अन्य नातलग आता या मालमत्तांवर हक्क गाजवत आहेत. त्यामुळे मुल्ला चाचांना त्यांनी झिडकारले. घराबाहेर काढले. यातून बेवारस म्हणून त्यांचा वेदनादायी प्रवास सुरू झाला.

सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या चाचांना सांगलीचे ‘सावली’ निवारा केंद्र लाभले. २८ जानेवारी २०१९ मध्ये त्यांचे केंद्रात आगमन झाले. उठ-बस करता येत नसल्याने ते झोपूनच होते. झोपून त्यांच्या शरीराला अनेक ठिकाणी जखमा होऊन जंतुसंसर्ग झाला. केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर व उपायुक्त स्मृती पाटील यांना मुल्ला चाचांची कहाणी सांगितली. अधिकाऱ्यांचेही मन हेलावले. त्यांनी तातडीने आर्थिक तरतूद करून निवारा केंद्रात पाण्याची गादी आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची सुश्रूषा करून कर्मचाºयांनी मुल्ला चाचांना बरे केले.

गेल्या तीन दिवसांपासून अचानक मुल्ला चाचांची मुलांच्या आठवणीने घालमेल झाली. त्यांनी जेवण सोडले. मुलांना, नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करून ते तडफडू लागले. पण नातलगांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. निर्दयी नात्यांचा हा दाहक अनुभव घेत चाचांनी सोमवार, दि. १३ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांचे नातलग लगेच दाखल झाले आणि त्यांनी अखेरची औपचारिकता पूर्ण केली.

डोळे... कोरडे आणि अश्रूंनी भरलेले
मुल्ला चाचांच्या निधनानंतर सावली निवारा केंद्रातील कर्मचारी, त्यांचे सहकारी यांच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते, तर दुसरीकडे रक्ताच्या नात्यातल्या माणसांचे डोळे कोरडे ठणठणीत होते. समाजातील दाहक वास्तव दाखविणारा हा प्रसंग अनेकांनी अनुभवला.
 

स्वार्थी नातेसंबंध पुन्हा अधोरेखित
नात्यांमध्ये लपलेला स्वार्थ, संपत चाललेली माणुसकी, करुणा, आपुलकी, प्रेम केवळ मुल्ला चाचांच्या कहाणीतूनच स्पष्ट झालेले नाही. सावली निवारा केंद्रात अत्यंत कमी काळात अशा अनेक स्वार्थी कहाण्या अधोरेखित झाल्या.

Web Title: Reacting to the refractory of the farmer rejected by the relatives - The inflammatory reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.