सांगली : जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. दिलेला शब्द पाळावा लागणार असल्याने कमी कालावधी असला तरी बदल केला जाईल, असे खासदार संजयकाका पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीचे धोरण यापूर्वीच ठरले आहे. सदस्यांना दिलेला शब्द पाळावाच लागेल. लोकांना सोबत कायम ठेवायचे असेल, तर दिलेल्या शब्दाप्रमाणे पावले उचलली पाहिजेत. आता नव्या पदाधिकाऱ्यांना कमी कालावधी मिळणार असला तरी बदल करायला हवा. यासाठी भाजपच्या सर्व सदस्य व नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील. याबाबत आ. सुरेश खाडे यांच्याशी नुकतीच चर्चा झाली आहे. अन्य नेत्यांशीही बातचीत झाली असून, सर्व जण याबाबत सकारात्मक असल्याने लवकरच याबाबत योग्य निर्णय होईल. शब्द पाळला जात नसल्याच्या कारणावरून सदस्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकसंधपणाने याविषयी निर्णय घेतला जाईल.
जिल्हा परिषदेचे भाजपचे सदस्य नितीन नवले यांनी भाजपवर नाराज आहे, म्हणून पक्ष सोडलेला नाही. त्यांचे जिल्हाध्यक्षांसोबत काही खासगी व्यवहारातून वाद होते. त्या कारणातून हे पक्षांतर झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेबाबत काही अडचणी नाहीत. तेथे लवकर अध्यक्ष बदल केला जाईल, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी आज येथे दिली.
चौकट
पक्षातून कोणीही जाणार नाही
भाजपचे जिल्हा परिषद सदस्या अन्य पक्षात जाणार नाहीत. त्याविषयीच्या चर्चांना अर्थ नाही. सदस्य नितीन नवले यांच्याबाबत पक्षस्तरावर कोणतीही नाराजी नव्हती. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसोबत व्यक्तिगत व्यवहाराचा त्यांचा विषय होता. त्यात अडचणी वाढल्यानंतर त्यांना निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती मला मिळाली आहे.