सांगली : गेली दोन दिवस अंधारात असणाऱ्या सांगलीच्या जुनी भाजी मंडईमध्ये बुधवारी महावितरणने उजेड पाडला. विजेच्या थकबाकीपोटी महावितरणने दोन दिवसांपूूर्वी येथील वीज पुरवठा खंडित केला होता.
गेल्या १३६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजी मंडईचा वीजपुरवठा तोडण्यात आला होता. तत्कालीन नगरपालिका व आता महापालिकेमार्फत या मंडईचे वीज बिल प्रत्येक महिन्याला भरण्यात येत होते. चालू महिन्याचे बिल न भरल्याने महावितरणने येथील वीज तोडली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी महावितरणच्या कारवाईबद्दल नाराजी व संताप व्यक्त केला होता. जुनी भाजी मंडई असोसिएशनचे अध्यक्ष मुसाभाई सय्यद यांनी सांगितले की, याप्रश्नी नगरसेवक हरीदास पाटील, शेखर माने, भारती दिगडे, पृथ्वीराज पवार या नेत्यांनी याप्रश्नी प्रयत्न केल्याने मंडईतील वीजपुरवठा सुरळीत झाला. गेले दोन दिवस येथील विक्रेत्यांना व्यापार करताना अनेक अडचणी आल्या होत्या. आता येथील व्यवहार पूर्ववत झाले आहेत.