रत्नागिरी शहर बनलेय ‘वेड्यांचे माहेरघर’
By Admin | Updated: August 7, 2015 22:30 IST2015-08-07T22:30:08+5:302015-08-07T22:30:08+5:30
नवी समस्या : भीतीमुळे निवाराशेडऐवजी प्रवासी उभे राहतात रस्त्यावर

रत्नागिरी शहर बनलेय ‘वेड्यांचे माहेरघर’
रत्नागिरी : अंगावरच्या वस्त्रांचा पत्ता नाही, वाढलेली दाढी व डोक्यावरील केसांच्या बटा, विक्षिप्त बोलणे, हावभाव, रस्त्याच्या मध्येच उभे राहणे, शहरातून कधीही भटकंती करताना मळकट कपड्यांमुळे पसरलेली दुर्गंधी... अशा स्थितीतील वेडे आपल्या आसपास कोठेही दिसतात. एकूणच शहरात सध्या वेड्यांचा सुळसुळाट झाला आहे. रत्नागिरी आता वेड्यांचे माहेरघर बनतंय की काय, इतकी चिंताजनक स्थिती दिसत आहे.संपूर्ण शहरात अधूनमधून कोठेतरी वेड्यांचे दर्शन होतेच, रस्त्यावर ही मंडळी हमखास सापडतात. नाहीतर एस. टी.च्या निवाराशेडमध्ये ठाण मांडलेली असतात. हातात एखादी फाटकी झोळी घेऊन तोंडाने बडबडत कचरा किंवा कागद वेचत फिरत असतात. अन्यथा रस्त्याच्या मध्ये किंवा फूटपाथवर ठाण मांडून बसलेली असतात किंवा दुभाजकांवर चक्क झोपलेले आढळतात. शहरातील काही निवारा शेडमध्ये तर वेड्यांनी बस्तान मांडले आहे. या वेड्यांच्या भीतीमुळे महिलावर्ग, विद्यार्थी यांना एस. टी.ची वाट पाहात निवाराशेडऐवजी रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. बस्तान जमवल्यामुळे निवाराशेडमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यातही रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.
या वेड्यांची शहरातून कोठेही, कशीही भटकंती सुरू असते. अंगावरच्या वस्त्रांचेही भान नसल्यामुळे महिला किंवा युवतींना मार्गक्रमण करणे अवघड होत आहे. विक्षिप्त हातवारे करीत वेगळ्याच भाषेत त्यांची बडबड सुरू असते. त्यामुळेही नागरिक भयग्रस्त होत आहेत. कोकणात रेल्वे सुरू झाल्यापासून शहरातील वेड्यांची संख्या वाढली आहे. शहरामध्येच प्रादेशिक मनोरूग्णालय आहे. याठिकाणी मनोरूग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. मात्र, त्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी मनोरूग्णांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाते. न्यायालयाच्या परवानगीने प्रादेशिक मनोरूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले जाऊ शकते.
शहरात दिवसा किंवा रात्री - अपरात्री फिरणाऱ्या वेड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, शहरामध्ये निर्माण झालेली दुर्गंधी लक्षात घेता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयाच्या परवानगीने मनोरूग्णालयात दाखल करावे, जेणेकरून योग्य उपचाराने मनोरूग्ण बरे होऊन आपल्या घरीही जाऊ शकतात. संबंधीत कार्यवाहीसाठी केवळ अर्धा दिवस पुरेसा आहे. मात्र, ‘कोणाला नसे त्याचे वावडे’ याप्रमाणे शहरात फिरणाऱ्या वेड्यांकडे लोक दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे एक नवीन समस्या निर्माण होत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करून आदेशप्राप्त मनोरूग्णाना तसेच नातेवाईकांकडून आलेल्यांनाच रूग्णांना मनोरूग्णालयात दाखल करून घेतले जाते. मनोरूग्णांवर वैद्यकीय उपचारांबरोबर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. मनोरूग्ण परराज्यातील असेल, तर इंटरप्रिटरच्या माध्यमाद्वारे त्याच्या भाषेत संवाद साधला जातो. त्याच्याबद्दल माहिती गोळा केली जाते. त्यानंतर संबंधित माहितीची खात्री केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ते स्वीकारण्यास तयार असतील तरच न्यायालयाच्या आदेशाने नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातात. काही मनोरूग्ण बरे होऊन घरी जातात. मात्र, बहुतांश मनोरूग्णांना शेवटच्या क्षणापर्यंत मनोरूग्णालयात वास्तव्य करावे लागते.
- डॉ. पराग पाथरे,
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरी.