सांगलीत बेदाण्याचा दर उतरला
By Admin | Updated: February 15, 2015 23:51 IST2015-02-15T23:11:03+5:302015-02-15T23:51:50+5:30
सौदे सुरु : आवक वाढली; ५० ते ६० रुपयांची घसरण

सांगलीत बेदाण्याचा दर उतरला
सांगली : येथील मार्केट यार्डमध्ये आज (रविवार) यावर्षीच्या नवीन बेदाण्याच्या सौद्यांना प्रारंभ झाला. आवकही चांगली झाल्याने बेदाण्याच्या दरात मात्र सुमारे ५० रुपयांनी किलोला घसरण झाली. आज सकाळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मनोहर माळी यांच्याहस्ते नवीन बेदाणा सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. आजच्या सौद्यामध्ये ७ हजार बॉक्स बेदाण्याची आवक झाली होती. आज झालेल्या सौद्यामध्ये कमीत कमी ११०, तर जास्तीत-जास्त दर २५१ रुपये निघाला. आजचा सरासरी दर १७५ रुपये होता. गतवर्षाच्या तुलनेत यावेळच्या दरात ५० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. मे. किसान कोल्ड स्टोअरेज या अडत्याकडे सौद्यास आलेल्या ए. एम. तेली (रा. तवलगी, जि. विजापूर) यांच्या बेदाण्यास २५१ प्रति किलो दर मिळाला.
यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा, सचिव पी. एस. पाटील, बेदाणा व्यापारी राजू कुंभार, सतीश पाटील, राजू माळी, आस्की सावकार, अश्विन पटेल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तीन दिवस सौदे निघणार
मार्केट यार्डमध्ये आज बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. यापुढे प्रत्येक रविवारी सौदे निघणार असून, याशिवाय बुधवारी व शुक्रवारीही बेदाण्याचे सौदे काढण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व सौद्याबाहेर व्यवहार टाळून नुकसान टाळावे, असे आवाहन मनोहर माळी यांनी केले आहे.