येळावीत बालिकेवर बलात्कार
By Admin | Updated: July 27, 2014 00:32 IST2014-07-27T00:22:44+5:302014-07-27T00:32:17+5:30
पलुसच्या संशयितास अटक : ग्रामस्थांकडून बेदम चोप, वाहनाची मोडतोड

येळावीत बालिकेवर बलात्कार
तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे नऊ वर्षीय बालिकेवर जिवे मारण्याची धमकी देऊन नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. सुरेश रामचंद्र पवार (वय ४४, रा. पवार मळा, पलूस) असे संशयित नराधमाचे नाव आहे. त्यास ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्याच्या मोटारीची मोडतोड करण्यात आली. आज, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेने येळावी परिसरात खळबळ उडाली आहे.
सुरेश पवार त्याच्या मोटारीतून (एमएच १०, एजी ९३१) दररोज विद्यार्थी वाहतुकीचे काम करतो. यातील पीडित मुलगी पलूस येथील असून, ती भिलवडी येथे एका शाळेत तिसरीमध्ये शिकत आहे. दररोज दुपारची शाळा असते. आज असल्याने सकाळची शाळा होती. सुरेश पवारने नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संबंधित मुलीस मोटारीतून शाळेत सोडले. शाळा सुटल्यानंतर त्याने सर्व मुलांना त्यांच्या घरी सोडले.
पीडित मुलीला मात्र तुझ्या आईने येळावीच्या घरी सोडायला सांगितले आहे, असे सांगून पलूसला नेले नाही. नेहमीच्या रस्त्याने गाडी न नेता वेगळ्याच रस्त्याने तो घेऊन गेला. येळावीतील एका शेताजवळ गाडी थांबवून त्याने बलात्कार केला. तेव्हा संबंधित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
जवळून जाणाऱ्या एकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने लगेचच मुलीच्या वडिलांना दूरध्वनीवरून बोलावून घेतले. तेव्हा गावातील काही लोक तिथे जमा झाले होते. त्यांनी सुरेश पवारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली व गाडीही फोडली. पीडित मुलगी रडत होती. पवारने जिवंत सोडणार नाही, मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे मुलीने घरच्यांना सांगितले. यापूर्वीही त्याने असा प्रकार दोन-तीनवेळा केल्याचे पीडित मूलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकाराने येळावी परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ५ सह ६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक रमेश बनकर, सहायक निरीक्षक एस. एस. गुजले यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी पवारला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)