..निदान निवडणुकीनंतर बलात्कार करायचा - आर.आर.पाटील यांची मुक्ताफळे
By Admin | Updated: October 11, 2014 17:07 IST2014-10-11T15:29:41+5:302014-10-11T17:07:51+5:30
आमदार व्हायचं होतं तर उमेदवाराने किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता, अशी मुक्ताफळे आर. आर. पाटील यांनी उधळली आहेत

..निदान निवडणुकीनंतर बलात्कार करायचा - आर.आर.पाटील यांची मुक्ताफळे
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.१२ - 'आमदार व्हायचं होत तर त्या उमेदवाराने किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता', अशी मुक्ताफळे उधळत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान 'आपला महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. उमेदवारावर उपरोधाने टीका केली होती, कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास खेद व्यक्त करतो' असे सांगत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
तासगाव येथील प्रचारसभेदरम्यान पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ समोर आला असून बलात्काराचा आरोप असणा-या मनसेच्या उमेदवाराला उद्देशून हे वक्तव्य करताना त्यांची जीभ घसरली. मनसेच्या काही लोकांनी आज माझी भेट घेऊन आम्हाला पाठिंबा जाहीर केला. मी त्यांना यामागचे कारण विचारले असता, आमच्या उमेदवारावर बलात्काराचा आरोप असल्याने तो सध्या तुरूंगात आहे असे त्यांनी मला सांगितले. त्या उमेदवाराला जर निवडणुकीला उभे रहायचे होते, आमदारकी मिळवायची होती, तर त्याने किमान निवडणुकीनंतर बलात्कार करायला हवा होता, असे पाटील यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. पाटील यांच्या या विधानावरून सर्व स्तरांतून टीकेची झोड उठत असून माजी गृहमंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
याच आर. आर. पाटील यांनी मुंबीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऐसे बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते रहते है' असे असंवदेनशील विधान करून खलबळ माजवली होती. त्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता.