खंडणीचा फोन सल्या चेप्याचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 00:59 IST2015-06-03T00:54:54+5:302015-06-03T00:59:10+5:30
सांगलीत गुन्हा दाखल : आयुब पटेल फरारच

खंडणीचा फोन सल्या चेप्याचा !
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा खजिनदार मुश्ताकअली रंगरेज यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील गुंड सलिम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगरेज यांना मोबाईलवरून त्याने खंडणीसाठी धमकाविल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आयुब बारगीर व आयुब पटेल फरारीच आहेत. यातील बारगीरचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
सांगलीतील गुंड निसार नगारजी, आयुब बारगीर व आयुब पटेल २३ मे रोजी रात्री साडेदहा वाजता रंगरेज यांच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी ‘कराडसे सलिम बात कर रहा है, बोलो’, असे म्हणून रंगरेज यांच्याकडे मोबाईल दिला होता. सलिम नामक व्यक्तीने ‘कराडसे सलिम बोल रहा हूँ, पाच लाख रुपये मेरे आदमीके पास दो,’ असे सांगितले. रंगरेज यांनी ‘कसले पैसे, कशासाठी द्यायचे?’, अशी विचारणा करताच सलिमने मोबाईल बंद केला होता. सलिम नामक व्यक्ती कोण, हे रंगरेज यांनाही समजले नाही. रंगरेज यांनी सलिमविरुद्ध फिर्याद दिली होती. गेल्या आठवड्यात नगारजीला अटक केली. त्याच्या चौकशीत सलिम नामक व्यक्ती म्हणजे कऱ्हाडचा गुंड सलिम शेख ऊर्फ सल्या चेप्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सल्यावर खंडणी व ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी कऱ्हाडला न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाल्याने सल्या गंभीर जखमी झाला होता. अजूनही तो झोपून आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागल्याने त्याने न्यायालयातून तात्पुरता जामीन मंजूर करून घेतला आहे. ४ जूनला त्याच्या जामिनावर अंतिम सुनावणी होणार आहे. संजयनगर पोलिसांचे पथक सोमवारी कऱ्हाडला गेले होते. त्याचा जबाब घेऊन पथक परतले आहे. (प्रतिनिधी)
सांगलीत नेटवर्क
नगरसेवक दाद्या सावंत याचा खून केल्याप्रकरणी संशयितांच्या यादीत सल्याचे नाव पुढे आले होते. सांगली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते.
तत्पूर्वी, त्याच्या टोळीतील गुंड समीर शेख सातारा पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी पाच वर्षांपूर्वी सांगलीत वास्तव्यास आला होता.
सांगली पोलिसांनी समीरला अटक करून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त केले होते. समीरला नगारजीने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले होते. खंडणीप्रकरणी सल्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे सांगलीतील गुन्हेगारांशी नेटवर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे.