कुटुंबाला संभाळत ‘खाकी’तील रणरागिनी कोरोनाविरोधात मैदानात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:53+5:302021-06-01T04:19:53+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्थित्यंतरे होत गेली. त्यावेळी विस्कळीत बनलेले जनजीवन अजूनही सुरळीत होताना ...

कुटुंबाला संभाळत ‘खाकी’तील रणरागिनी कोरोनाविरोधात मैदानात!
सांगली : कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्थित्यंतरे होत गेली. त्यावेळी विस्कळीत बनलेले जनजीवन अजूनही सुरळीत होताना दिसत नाही. कोरोना नियंत्रणासाठी सदैव बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांनाही कौटुंबिक जबाबदारी सांभाळून खबरदारी घेत कर्तव्य बजावावे लागत आहे. आपल्या लेकरांना कुटुंबाकडे सोपवून या खाकी वर्दीतील रणरागिणी कोरोनाविरोधात मैदानात उतरल्या आहेत.
कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध, कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दल कार्यरत आहे. नियमित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी असलेल्या बंदोबस्तासह कोरोना नियंत्रणासाठीही महिला पोलीस कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष कोरोना सेंटरबाहेर, कंटेन्मेंट झोनमध्येही या महिला पोलीस कर्तव्य बजावत आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी ड्युटींचे नियोजन करताना कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला त्रास होणार नाही याचे नियाेजन केले आहे. ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना जोखमीची ड्युटी दिली जात नाही. महिला पोलिसांनाही ड्युटी देताना काळजी घेतली जात आहे.
बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांना घरातील सर्व जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात. घरातील नेहमीची कामे उरकून त्या कामावर हजर राहतात. दिवसभरात दिलेल्या ‘पॉईंट’वर त्यांची सेवा सुरू असते.
चौकट
संवादासाठी मोबाईलचा आधार
कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांना काम करताना मोबाईलद्वारे घरी संपर्क साधून माहिती घ्यावी लागते. रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यानंतर कर्मचारी घरच्यांशी संवाद साधत असतात. कोरोनाविषयक काळजी घेण्यासाठीही त्यांचे प्राधान्य असते.
कोट
सध्या आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. आई-वडिलांच्या काळजीमुळे वारंवार सॅनिटायझरचा वापर करते. शिवाय मास्कच्या वापरासह काळजी घेते. तरीही कोरोना कालावधीतील आव्हानात्मक समाधान देणारे आहे. या काळात सेवेत राहणे कर्तव्य समजते.
- रुपाली गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक.
कोट
कुटुंबातील सर्व जबाबदारी संभाळून कार्यरत आहे. माझे बाळ सासूबाई सांभाळतात. त्यामुळे काळजी वाटत नाही. मात्र, सकाळी ड्युटीला आल्यानंतर बाळ झोपलेले असते. संध्याकाळी घरी गेल्यानंतरही झोपलेले असते. त्यामुळे त्याच्याशी तितका वेळ घालवता येत नाही, ही खंत असली तरी कर्तव्यात कोणतीही कसूर राहू देत नाही.
-कांचन केसकर, पोलीस कर्मचारी.
कोट
माझा एक मुलगा दहा वर्षाचा, तर दुसरा चार वर्षाचा आहे. एक गावी असतो आणि दुसरा आमच्याजवळ आहे. माझे पती एसटी महामंडळात सेवेत आहेत. सध्या त्यांचे कामकाज बंद असल्याने ते लक्ष देतात. दुसरा मुलगा सासूबाई संभाळत आहेत. कोरोनामुळे काळजी घ्यावी लागत आहे.
- मंदाकिनी कोळी
कोट
कामावर असताना मुलांची भेट होत नाही ही खंत असली तरी आम्ही करत असलेले काम खूप महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे सेवेत काळजी घ्यावी लागते. आम्ही आवश्यक ती काळजी घेऊन कामे करत असतो. घरातील कामांसाठी व मुलांसाठी वेळ देता नाही हीच खंत आहे.
- मनीषा जाधव
कोट
ड्युटीवरून घरी गेल्यानंतर सॅनिटायझरसह इतर सर्व काळजी घेऊनच दीड वर्षाच्या बाळाजवळ जाते. दिवसभरात कधी बाळाची आठवण आली की, कॉल करून माहिती घेते. मात्र, तरीही ड्युटी आणि कर्तव्यास प्राधान्य देते आहे. काम करताना काळजी घेत असल्याने कुटुंबाला सुरक्षित ठेवता येते.
- प्रतीक्षा भोसले
कोट
माझे लहान बाळ बहिणीकडे ठेवून मी ड्युटीवर येत असते. बाळासाठी व कुटुंबासाठी वेळ कमी देता येतो. आम्ही कोरोना नियंत्रणासाठी देत असलेले योगदान महत्त्वाचे वाटते. पुरेशी काळजी घेऊन या कामात असल्याने समाधान मिळते.
- शुभांगी भगत