राममंदिर-सिव्हिल रस्ता वाहतुकीला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:31+5:302021-06-09T04:34:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील राममंदिर चौक ते सिव्हिल हाॅस्पिटल या पहिला ट्रिमिक्स काँक्रीट रस्त्याचे काम अजून पूर्ण ...

राममंदिर-सिव्हिल रस्ता वाहतुकीला खुला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील राममंदिर चौक ते सिव्हिल हाॅस्पिटल या पहिला ट्रिमिक्स काँक्रीट रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नसताना सोमवारी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर वाहतुकीसाठी काही ठिकाणी मुरूम टाकत वाहनांना वाट करून देण्यात आली.
राममंदिर चौक ते सिव्हिल हाॅस्पिटल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यात सिव्हिल चौकात पावसाचे पाणी साचत असल्याने वारंवार हा रस्ता खराब होत होता. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सव्वा कोटीचा निधी मंजूर करीत ट्रीमिक्स काँक्रीटचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले. त्यासाठी दोन्ही बाजूला पत्रे लावून वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना सोमवारी अचानक महापौर सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, शहर अभियंता संजय देसाई यांनी कामाची पाहणी केली.
यावेळी महापौरांनी पत्रे हटवून रस्ता वाहतुकीला खुला करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनाने राममंदिर चौकाकडील पत्रे हटविले. पण अजूनही रस्त्याचे काम अर्धवट आहे. राममंदिर चौकात काँक्रीटचा रस्ता व डांबरी रस्त्याचा अप्रोच नाही. तिथे मुरूम टाकून वाहनांची सोय केली. सिव्हिल हाॅस्पिटल चौकात अजून जलवाहिनी व इतर कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे केवळ एका बाजूचे पत्रे काढण्यात आले आहेत. रस्त्यावरील दुभाजकाचेही काम अपूर्ण आहे. विद्युत खांबही बसविलेले नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथचे कामाला अजून सुरुवातच झालेली नाही. अशी परिस्थिती असतानाच अचानकच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट
कोट
राममंदिर चौक ते सिव्हिल हाॅस्पिटल हा रस्ता वर्दळीचा आहे. चार महिने तो बंद असल्याने नागरिकांना त्रास झाला. आता रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. रस्त्याची अपूर्ण कामे वाहतुकीला अडथळा न करता पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला दिली आहे. - दिग्विजय सूर्यवंशी, महापौर