उत्तरा केळकर यांना राम कदम पुरस्कार--मिरजेत समारंभ :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 21:23 IST2017-09-22T21:21:58+5:302017-09-22T21:23:36+5:30
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात शुक्रवारी संगीतकार राम कदम पुरस्कार पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याहस्ते देण्यात आला.

उत्तरा केळकर यांना राम कदम पुरस्कार--मिरजेत समारंभ :
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात शुक्रवारी संगीतकार राम कदम पुरस्कार पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याहस्ते देण्यात आला. संगीत सभेत शास्त्रीय गायन व राम कदम यांच्या मराठी चित्रपट गीतांना श्रोत्यांनी दाद दिली.
चिन्मयी आठले (कोल्हापूर) यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग भीमपलास आळविला. विलंबित एक तालात रे विरहा, द्रुत त्रितालात पिया पास ले जाये, तराणा नाम मुखी घ्या हे भजन, घटघट मे पंछी बोलना हे निर्गुणी भजन त्यांनी सादर केले. हरिप्रिया पाटील यांनी हार्मोनियम साथ, विरेश संकाजे यांनी तानपुरासाथ व प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली. चिन्मयी आठले यांच्या बहारदार गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
संगीतकार राम कदम पुरस्कार पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना देण्यात आला. याप्रसंगी विजय राम कदम, मेधा चांदवडकर, सुगंधा तिरोडकर, नवरात्र संगीत महोत्सवाचे अध्यक्ष मधू पाटील यांच्यासह मोठ्यासंख्येने श्रोते उपस्थित होते. यावेळी ‘स्वरताल’ हा संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.
विजय कदम व उत्तरा केळकर यांनी राम कदम यांनी संगीतबध्द केलेली मराठी चित्रपट गीते सादर केली. संगीत महोत्सवात शनिवारी ‘विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार’ महिला तबला वादक धनश्री नागेशकर यांना देण्यात येणार आहे.
संगीत महोत्सवात दि. २८ पर्यंत अमेरिकन कलाकार न्यॅश न्युबर्ट यांच्या बासरीवादनासह दिग्गज कलाकार मंडळी गायन-वादन व नृत्य सादर करणार आहेत. विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले.