जत मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच

By Admin | Updated: August 18, 2014 23:56 IST2014-08-18T23:45:32+5:302014-08-18T23:56:01+5:30

मोर्चेबांधणी जोमाने : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक सरसावले

The rake for the candidature of Jat constituency | जत मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच

जत मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच

भागवत काटकर - शेगाव --जत तालुक्याच्या राजकीय मैदानावर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला जोरदार वेग आला आहे. २००९ प्रमाणे आताही कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.
२००९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीची उमेदवारी विलासराव जगतापांना मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचे उमेदवार आमदार प्रकाश शेंडगेंना पाठिंबा दिला होता. आता भाजपची उमेदवारी आमदार शेंडगे की विलासराव जगतापांना मिळणार, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. शेंडगे व जगताप गटाकडून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळाल्याची अफवा पसरवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांचा विलासराव जगताप यांनी जाहीर प्रचार केला. त्यावेळी भाजप नेत्यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. शिवाय जगताप यांनी जुलैच्या शेवटी किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला
होता. मात्र अद्यापही त्यांचा प्रवेश नाही.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या पक्षनिरीक्षकांनी सांगलीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये जगताप व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली. आमदार शेंडगे अनुपस्थित होते, तरीही त्यांचा अर्ज त्यांच्या एका समर्थकाने पोहोच केलाच. या घडामोडीनंतर दोन-तीन दिवसांपासून जगताप व आमदार शेंडगे यांचे कार्यकर्ते भाजपची उमेदवारी आम्हालाच मिळाल्याचे सांगत आहेत. आम्ही वरिष्ठांना दूरध्वनी करून माहिती घेतली आहे, तुमची उमेदवारी ‘फायनल’ असल्याचा आम्हाला निरोप मिळाल्याचे दोघांचेही कार्यकर्ते सांगत आहेत.
एकीकडे भाजपची उमेदवारी आम्हालाच मिळाल्याचा दावा शेंडगे व जगताप समर्थकांकडून केला जात असला तरी, भाजपकडून जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या यादीकडे जगताप व शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे, एवढे मात्र नक्की!

Web Title: The rake for the candidature of Jat constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.